पंजाबचा प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला याची दोन वर्षांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली होती. यानंतर सिद्धूचे पालक बलकौर सिंग आणि आई चरण कौर यांच्या जीवनात पुन्हा एकदा आनंदाचे क्षण परतले आहेत. सिद्धूची आई चरण कौर यांनी ५८ व्या वर्षी आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या मदतीने मुलाला जन्म दिला आहे. मात्र या घटनेनंतर आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पंजाब सरकारकडून या उपचाराबाबतचा सविस्तर तपशील मागितला आहे. केंद्र सरकारने बनविलेल्या नियमावलीनुसार २१ ते ५० दरम्यान वय असलेल्या महिलांनाच आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा लाभ घेता येऊ शकतो. पण चरण कौर या ५८ वर्षांच्या असल्यामुळे केंद्र सरकारने संपूर्ण प्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संचालक एस. के. रंजन यांनी पंजाबच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांना १४ मार्च रोजी पत्र पाठविले आहे. सहाय्यक पुनरुत्पादन तंत्रज्ञान (नियमन) कायदा, २०२१ अंतर्गत चरण कौर प्रकरणात त्यांनी काय कार्यवाही केली, याबाबतचा खुलासा केंद्राने मागितला आहे.

Video: पहिल्यांदा दुसऱ्या लेकाला पाहताच सिद्धू मुसेवालाच्या आई-वडिलांची होती ‘ही’ रिअ‍ॅक्शन; व्हिडीओ होतोय व्हायरल

या पत्रात रंजन यांनी लिहिले की, आम्हाला माध्यमातील बातम्यामधून समजले की, मुसेवालाची आई चरण कौर यांनी आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर करून ५८ व्या वर्षी मुलाला जन्म दिला. सहाय्यक पुनरुत्पादन तंत्रज्ञान (नियमन) कायद्याच्या कलम २१ (ग) (१) नुसार आयव्हीएफच्या मदतीने आई होण्यासाठी २१ ते ५० अशी वयोमर्यादा आखून देण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धू मुसेवालाच्या पालकांनी परदेशात जाऊन आयव्हीएफ तंत्रज्ञानाचे उपचार केले. मुसेवाला दाम्पत्याला मुलगा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बलकौर सिंग यांनी पंजाब सरकारवर छळवणुकीचा आरोप लावला. माझ्या मुलाच्या जन्माचा पुरावा दाखविण्यासाठी आमच्यावर दबाव टाकला जात आहे. जिल्हा प्रशासनाने आमच्याकडे कागदपत्रांची पूर्तता करण्याचा पिच्छा पुरविला आहे. बलकौर सिंग यांनी नवजात बालकाची कागदपत्रे पुरविण्यासाठी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याकडे वेळ मागितला आहे.

IVF द्वारे मूल कसे जन्माला येते? अंडी गर्भात ठेवण्यापूर्वीचा प्रवास डॉक्टरांनी दाखवला; पाहा Video

रविवारी १७ मार्च रोजी बठिंडा येथील जिंदाल रुग्णालयात मुलाचा जन्म झाल्यानंतर पंजाबमधील अनेक राजकीय नेत्यांनी आणि मुसेवालाच्या चाहत्यांनी मुसेवाला दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. बलकौर सिंग यांनी सांगितले की, त्यांनी नवजात मुलाचे नाव सुखदीप ठेवलं आहे. सिद्धू मुसेवालाचेही नाव सुखदीप सिंग सिद्धू असे होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२० मे २०२२ रोजी सिद्धू मुसेवालाची पंजाबच्या मनसा जिल्ह्यात हत्या झाली होती. या हत्याप्रकरणात एकूण ३१ जणांवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. ज्यामध्ये गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांचाही समावेश आहे.