काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार धीरज साहू यांच्या कंपनीच्या कार्यालय आणि निवासस्थानावर प्राप्तीकर विभागाने धाडी टाकून बेहिशेबी संपत्ती जप्त केली आहे. प्राप्तीकर विभागाने झारखंड, ओडिशामध्ये धाडी टाकून ही मालमत्ता जप्त केली आहे. कपाटात ठासून भरलेले नोटांचे बंडल… पाचशे, दोनशे, शंभर रुपयांच्या नोटांच्या बंडलांच्या इमारती पाहून अधिकाऱ्यांचेही डोळे पांढरे झाले असतील. या छापेमारीत आतापर्यंत २१० कोटी रुपये प्राप्तीकर विभागाच्या हाती लागले आहेत. अजूनही कारवाई सुरू असून ही रक्कम आणखी वाढू शकते.

नोटांनी भरलेली ३० कपाटे सापडली असल्याचे वृत्त समोर आलं आहे. पैशांचे हे बंडल मोजण्यासाठी ३० हून अधिक कर्मचारी काम करत आहेत. हे कर्मचारी पैसे मोजण्यासाठी मशीन्स वापरत आहेत. परंतु, पैसे मोजता मोजता यातल्या काही मशीन्स बिघडल्या तरी अजून हे पैसे मोजून झालेले नाहीत. मोजून झालेले पैसे ओडिशातील बलांगीर शहरातल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत जमा करण्यात आले आहेत. आतापर्यंत १५० बॅगांमध्ये भरून काही पैसे बँकेत नेऊन ठेवण्यात आले आहेत.

दरम्यान, काँग्रेस खासदारावरील या मोठ्या कारवाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते ओडिशा-झारखंडमधील आमदारांपर्यंत अनेक नेत्यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. “देशातील नागरिकांनी या नोटांच्या ढिगाऱ्याकडे पाहावं आणि त्यानंतर त्यांच्या (काँग्रेसच्या) इमानदार नेत्यांची भाषणं ऐकावित, जनतेकडून लुटलेल्या प्रत्येक पैशाचा हिशेब यांना द्यावा लागेल. ही मोदीची गॅरंटी आहे.”

दरम्यान, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील यावरून काँग्रेसला टोला लगावला आहे. बावनकुळे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, “गरीब हटाओचे नारे देत, जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकत, गरिबीचे सोंग आणत काँग्रेसी कसे दौलतजादे बनतात, याचं जीवंत उदाहरण म्हणजे काँग्रेस खासदार धीरज साहू. आयकर बुडवून बेहिशेबी पैसा इतका दडवून ठेवला की मोजता मोजता मशिन्स बंद पडल्या.

हे ही वाचा >> “तर लाठीचार्जनंतर मनोज जरांगेंना सहानुभूती..”, देवेंद्र फडणवीसांचं उत्तर वाचून दाखवत भुजबळांचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बावनकुळे यांनी म्हटलं आहे, जनतेला सांगायचे ‘धीरज रखो, भला होगा’ आणि स्वतः गरिबांच्या पैशावर डोळा ठेवून गब्बर व्हायचे. भ्रष्टाचाराने बरबटलेले काँग्रेस राजवटीतील गरिबांचे लुटारू आता जनतेला पुराव्यासह दिसू लागले. मोहोब्बतच्या दुकानाच्या शटरमागे गरिबांना लुटणारे काँग्रेसचे असे ‘करप्शनचे काळेकुट्ट दुकान’ आहे.