भारताने पाठवलेलं चांद्रयान-३ हे अवकाशयान काल (२४ ऑगस्ट) चंद्रावर यशस्वीरित्या उतरलं. विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं. इस्रोने चंद्रावर आपलं यान उतरवून भारताला एलिट स्पेस क्लबमध्ये स्थान मिळवून दिलं आहे. या कामगिरीमुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अंतराळयान उतरवणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. चांद्रयान चंद्रावर उतरल्यानंतर काल (२३ ऑगस्ट) रात्री विक्रम लँडरने तिथले फोटो आणि आपण चंद्रावर पोहोचल्याचा संदेश इस्रोच्या बंगळुरू येथील मुख्यालयाला पाठवला.

भारताच्या या चांद्रमोहिमेत आता पुढचे टप्पे काय असणार आहेत? विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर तिथे काय कय करणार? २४ तासांनंतर तिथली परिस्थिती कशी आहे? असे अनेक प्रश्न लोकांना पडले आहेत. याची उत्तरं इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ आणि इस्रोने दिली आहेत.

इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ म्हणाले, या चांद्रमोहिमेत आता पुढचे १४ दिवस खूप महत्त्वाचे असणार आहेत. आपला सहा चाकी रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर फिरेल, तिथे वेगवेगळे प्रयोग केले जातील. चंद्रावरील एक दिवस हा पृथ्वीवरील १४ दिवसांच्या बरोबरीचा असतो. तिथे संशोधनासाठी विक्रम लँडरबरोबर पाच पेलोड पाठवले आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाणी आणि खनिजे असल्याचा दावा आतापर्यंत अनेक अंतराळ संस्थांनी केले आहेत. आपल्यालाही तशी शक्यता जाणवते. त्यामुळेच आपला प्रज्ञान रोव्हर तिथे त्यासंबंधीचं संशोधन करेल आणि इस्रोला यासंबंधीची माहिती पाठवेल.

हे ही वाचा >> “…म्हणून आम्ही दक्षिण ध्रुव निवडला”, इस्रो प्रमुखांनी सांगितलं Chandrayaan 3 मोहिमेचं मुख्य उद्दिष्ट

एस. सोमनाथ म्हणाले, लँडिंगची जी जागा ठरली होती, विक्रम लँडरने त्याच ठिकाणी यशस्वी लँडिंग केलं आहे. लँडरमधून रोव्हर बाहेर आला आहे. तो आता चंद्राच्या पृष्ठभागावर फिरत आहे. दरम्यान, इस्रोने एक ट्वीट करून चांद्रयान ३ मोहिमेची आतापर्यंतची (२४ तासांनंतरची) माहिती दिली आहे. मोहिमेची सर्व कामं वेळापत्रकानुसार होत आहेत. सर्व यंत्रणा सुरळीत आहेत. रोव्हर मोबिलिटी ऑपरेशन्स सुरू झाले आहेत. लँडर मॉड्यूलचे तीन पेलोड सुरू झाले आहेत. प्रोपल्शन मॉड्यूलवरील शेप पेलोड रविवारीच सुरू केला होता.