केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी राज्यसभेत जम्मू-काश्मीरला लागू असलेले घटनेचे कलम ३७० हटवण्याची शिफारस मांडली. अमित शाह यांनी ही शिफारस मांडताच संसदेत मोठया प्रमाणावर गदारोळ झाला. केंद्र सरकारने संसदेत जम्मू-काश्मीरच्या विभाजनाचा प्रस्ताव मांडला. आतापर्यंत लडाख जम्मू-काश्मीरचा हिस्सा होता. प्रस्तावानुसार जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करण्याचा प्रस्ताव आहे. दरम्यान हा प्रस्ताव मांडण्याच्या पार्श्वभूमीवर मागच्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये मोठया प्रमाणावर सैन्यबळ वाढवण्यात आले आहे. याच मुद्द्यावरुन आज शाह यांनी शिफारस मांडल्यानंतर लेखक चेतन भगतने या शिफारशीला विरोध करणाऱ्यांना एक सल्ला दिला आहे.

कलम ३७० काढून टाकण्यासंदर्भात संसदेमध्ये घोषणा झाल्यानंतर चेतन भगतने ट्विटवरुन याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. हे कलम काढून टाकल्याने देशातील शांतात भंग करुन हिंसेचा अवलंब करणारे देशाचे शत्रू असतील असं मत भगत याने व्यक्त केले आहे. ‘कलम ३७० हटवण्याचे कारण देत देशातील शांतता भंग करुन हिंसा करणारा या देशाचा शत्रू असेल. देशाचा कारभार शांततेत चालू द्या. नंतर पश्चाताप होईल असं कोणतही पाऊल उचलू नका,’ असं भगत आपल्या ट्विटमध्ये म्हटला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याच्या घोषणेची मागील आठवड्याभरापासून तयारी सुरु होती. मागील आठवड्यामध्ये जवळजवळ ३५ हजार सैनिक जम्मू-काश्मीरमध्ये तैनात करण्यात आले आहे. राज्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच सोमवारी मध्यरात्री जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष ओमर अब्दुल्ला या दोघांनाही नजरकैद करण्यात आले. या घोषणेनंतर कोणत्याही प्रकारची हिंसा होऊ नये म्हणून कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. दरम्यान कलम १४४ लागू झाल्यानंतर शाळा आणि महाविद्यालयंही बंद ठेवण्यात आली आहेत. राज्यातील इंटरनेट आणि लँडलाईन सेवाही बंद करण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांना सॅटेलाईट फोन देण्यात आले आहेत.