एका मोठ्या धर्मांतर रॅकेटचा सूत्रधार असलेल्या छांगूर बाबा याने स्वत:ला आणि त्याच्या संघटनेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असल्याचा बनाव केल्याचे तपासात उघड झाले आहे. हा बाबा सध्या उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाच्या ताब्यात आहे. फसवणूक करून धर्मांतरास भाग पाडल्याच्या आरोपांखाली त्याची चौकशी केली जात आहे. त्याच्या रॅकेटला प्रामुख्याने मध्य पूर्वेतून आणि राज्यांमधील बेकायदेशीर मालमत्तेतून १०६ कोटींचा परदेशी निधी मिळाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयदेखील या तपासात सामील झाले आहे.

छांगूर बाबा उर्फ जमालुद्दीन हा भारत प्रतिकार्थ सेवा संघ नावाच्या संघटनेचा सरचिटणीस होता. या प्रकरणातील दुसरा आरोपी ईदुल इस्लाम ही संघटना चालवत होता. तपास अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली की, संघटनेचे नाव जाणूनबुजून असे निवडण्याच आले होते जेणेकरून ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न किंवा संबंधित असल्याचा खोटा आभास निर्माण होईल. आरोपींनी संघटनेच्या लेचरहेडवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटोदेखील वापरला होता.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, संघाशी संबंधित असल्याबाबत विश्वास निर्माण व्हावा यासाठी या आरोपींनी नागपूरमध्ये संघटनेचे एक बनावट केंद्रदेखील स्थापन केले.

एटीएसच्या चौकशीव्यतिरिक्त ईडीच्या लखनऊ इथल्या विभागीय कार्यालयाने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर छांगूर बाबा याच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोपही दाखल करण्यात आले आहेत.

या प्रकरणाचा तपास करत असलेल्या पोली अधिकाऱ्यांनी सांगितले की, छांगूर बाबाने चालवलेल्या धर्मांतर रॅकेटमध्ये त्याने इच्छा पूर्ण करण्यासाठी दर्ग्यांना भेट देणाऱ्या लोकांना लक्ष्य केले होते. हिंदू महिला आणि धार्मिक श्रद्धा असलेल्या लोकांवरही या आरोपींची नजर असे.

देहरादूनमधून एका व्यक्तीला अटक

छांगूर बाबा टोळीने चालवलेल्या धर्मांतर रॅकेटशी संबंध असल्याच्या आरोपाखाली यूपी एटीएसने शुक्रवारी एका व्यक्तीला अटक केली. अब्दुल रहमान असे या व्यक्तीचे नाव असून त्याला सहसपूर परिसरातून ताब्यात घेण्यात आल्याचे देहारादूनचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अजय सिंह यांनी पीटीआयला सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

छांगूर बाबाची सहकारी नीतू उर्फ नसरीन हिला ५ जुलै रोजी अटक करण्यात आली. छांगूर बाबाचा मुलगादेखील या रॅकेटमध्ये सहभागी आहे. पीएमएलए प्रकरणाच्या चौकशीचा भाग म्हणून ईडीने छांगूर बाबा आणि त्याच्या साथीदारांशी संबंधित १४ ठिकाणी छापे टाकले. यापैकी १२ ठिकाणं उत्तर प्रदेशातील आणि दोन मुंबईत आहेत. या छाप्यांमध्ये जमिनीची कागदपत्रे, सोने, आलिशान गाड्या आणि बेहिशेबी रोख रक्कम जप्त करण्यात आली.