CJI B.R Gavai On Yogi Aadityanath: भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी रविवारी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या वकिलांच्या चेंबरच्या उद्घाटन समारंभात बोलताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले आहे.
केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी या कार्यक्रमात बोलताना म्हटले होते की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देशातील सर्वात शक्तिशाली आणि मेहनती मुख्यमंत्री आहेत. मेघवाल यांच्यानंतर बोलताना सरन्यायाधीश बी.आर. गवई म्हणाले की, “योगीजी तर पॉवरफुल आहेतच, पण आमचे मित्र न्यायमूर्ती विक्रम नाथजीही आज सर्वात पॉवरफुल न्यायाधीश आहेत.”
सरन्यायाधीश बी.आर. गवई आपल्या भाषाणाच्या सुरुवातील म्हणाले की, “आत्ताच मेघवालजी (कायदा आणि न्यायमंत्री) म्हणाले की मुख्यमंत्री योगीजी हे या देशातील सर्वात पॉवरफुल आणि मेहनती मुख्यमंत्री आहेत, मी असे म्हणू इच्छितो की, अलाहाबादची भूमीच पॉवरफुल लोकांची आहे. योगीजी खरोखरच पॉवरफुल आहेत, पण आमचे मित्र, न्यायमूर्ती विक्रम नाथजीही आज सर्वात पॉवरफुल न्यायाधीश आहेत.”
यानंतर थोडेसे हसत सरन्यायाधीश म्हणाले की, “मी आज जास्त काहीही बोलू इच्छित नाही, मी २४ नोव्हेंबर नंतर बोलेन.” दरम्यान सरन्यायाधीश बी.आर गवई २३ नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत.
आपल्या भाषणादरम्यान, “सरन्यायाधीशांनी देशाच्या संविधानाबद्दलही भाष्य केले. ते म्हणाले की, “जेव्हा जेव्हा या देशाला संकटाचा सामना करावा लागला आहे, तेव्हा तेव्हा देश पूर्णपणे एकजूटीने याला सामोरे गेला आहे. गेल्या ७५ वर्षांत आपले संविधान खूप भक्कम झाले आहे. सध्या भारताच्या शेजारील देशांमध्ये कोणती परिस्थिती आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे.”
सरन्यायाधीश गवई आपल्या भाषणाच्या शेवटी म्हणाले की, “प्रत्येक न्यायाधीशाला तो ज्या बार काऊंसीलमधून येतो त्याचा अभिमान असतो. जसा मला नागपूर बार काऊंसीलचा अभिमान आहे. देशातील सर्वोत्तम वकील मोतीलाल नेहरू आणि तेज बहादूर सप्रू यांच्यासारखे वकील अलाहाबादचे आहेत, असे अनेक कायदेतज्ज्ञ येथून आले आहेत. हिंदी साहित्यातही प्रयागराजचे मोठे योगदान आहे. चंद्रशेखर आझाद यांचे बलिदानही संपूर्ण देशाला आठवते.”
रविवारी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी.आर गवई अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या परिसरात १२ मजली अॅडव्होकेट चेंबर्स आणि मल्टी-लेव्हल पार्किंगचे उद्घाटन करण्यासाठी उपस्थित होते. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याव्यतिरिक्त, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल, न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जेके माहेश्वरी, न्यायमूर्ती बी.व्ही नागरत्न, न्यायमूर्ती विक्रम नाथ उपस्थित होते.