Supreme Court CJI Sanjiv Khanna Retire : भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना आज निवृत्त झाले असून सकाळीच त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील त्यांच्या सहकाऱ्यांना निरोप दिला. तसंच, न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्याकडे त्यांच्या पदाची सूत्रे सोपवली. निवृत्तीच्या दिवशी खंडपीठाला संबोधित करताना संजीव खन्ना निशब्द झाले होते. परंतु, यावेळी त्यांनी त्यांचे उत्तराधिकारी बी. आर. गवई यांचं कौतुक केलं. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
संवीज खन्ना म्हणाले की, जनतेचा विश्वास सहज मिळत नाही, तो मिळवावा लागतो. सर्वोच्च न्यायालयामुळे मला तो मिळवता आल. मी नि:शब्द आहे. माझ्या मनात खूप आठवणी आहेत. एकदा तुम्ही वकील झालात की, तुम्ही आयुष्यभर वकीलच राहता. न्यायव्यवस्था ही एक सामान्य संज्ञा आहे, जी खंडपीठ आणि बारचे प्रतिनिधित्व करते. बार हा विवेकाचा रक्षक आहे.” खन्ना पुढे म्हणाले, न्यायाधीश वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून सर्वोच्च न्यायालयात येतात आणि या विविधतेमुळे न्यायालयीन निर्णय घेण्यास मदत होते.
बी. आर. गवई यांच्याबाबत बोलातना सरन्यायाधीश म्हणाले, बी. आर. गवई यांच्या रुपाने तुम्हाला एक महान सरन्यायाधीश मिळेल. ते मुलभूत अधिकार आणि स्वातंत्र्याचे रक्षण करतील.
संजीव खन्ना हे २००५ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले होते. त्यानंतर २००६ मध्ये तिथे कायमस्वरुपी न्यायाधीश बनले. २०१९ मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयात बढती देण्यात आली. गेल्या नोव्हेंबर महिन्यात त्यांच्याकडे सरन्यायाधीश पदाची जबाबदारी देण्यात आली. २०१९ पासून न्यायमूर्ती खन्ना यांनी कलम ३७०, व्यभिचाराला गुन्हेगारीमुक्त करणे, निवडणूक रोखे योजना आणि ईव्हीएम-व्हीव्हीपीएटी टॅली प्रकरणी यासराख्या अनेक महत्त्वाच्या निकालांचा एक भाग म्हणून काम केलंय.
बी. आर. गवई उद्या स्वीकारणार पदभार
तर, न्यायमूर्ती बीआर गवई उद्या भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. न्या. गवई यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९६० रोजी अमरावतीमध्ये झाला. त्यांचे वडील रामकृष्ण सूर्यभान गवई आंबेडकरी चळवळीच्या प्रमुख नेत्यांपैकी होते. त्यांनी अमरावतीचे खासदारपद व पुढे बिहार, सिक्कीम आणि केरळचे राज्यपालपद भूषवले. भूषण गवई तीन भावंडांपैकी ज्येष्ठ होते. वडील राजकारण, समाजकारणात सक्रिय असल्याने बालपणापासूनच त्यांना सामाजिक कार्याचा वारसा लाभला.