पीटीआय, बीजिंग : भारत आणि चीन हे जोवर सहकार्यासाठी एकत्र येत नाहीत, तोवर आशियाई क्षेत्र उभे राहू शकत नाही, या भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या विचाराशी शुक्रवारी चीनने सहमती व्यक्त केली. या दोन देशांमध्ये जेवढे मतभेदाचे मुद्दे आहेत, त्यापेक्षा जास्त  परस्पर हितसंबंधांच्या बाबी आहेत, असे चीनने म्हटले आहे.

  बँकाक येथील चुलॅलाँगकॉर्न विद्यापीठात गुरुवारी बोलताना जयशंकर यांनी सांगितले होते की, चीनने सीमाभागात जे केले आहे, त्यामुळे सध्या भारत-चीन संबंध अत्यंत कठीण स्थितीत आहेत. हे दोन शेजारी जोवर एकत्र येत नाहीत, तोवर आशिया क्षेत्र उभे राहू शकत नाही. 

 यावर, चीनच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते वांग बानबिन  म्हणाले की, चीनच्या नेत्यांनी आधीच स्पष्ट केल्यानुसार, जोवर चीन आणि भारत यांचा विकास होत नाही, तोवर आशियाई क्षेत्र उभे राहू शकत नाही. जोपर्यंत चीन, भारत आणि अन्य शेजारी देश यांचा विकास होत नाही, तोवर खऱ्या अर्थाने आशिया-प्रशांत क्षेत्र किंवा आशियाई क्षेत्र उभे राहूच शकत नाही. चीन आणि भारत या दोन प्राचीन मानवी संस्कृती आहेत. तसेच त्या दोन प्रमुख उभरत्या अर्थसत्ता आहेत.  एकमेकांना अडचणीत आणण्यापेक्षा एकदुसऱ्याला मदत करून विकास साधण्याचे शहाणपण आणि क्षमता दोन्ही बाजूंत आहे.