स्वनातीत अण्वस्त्र प्रक्षेपण वाहन चीनने तयार केले असून त्याची चौथी चाचणी यशस्वी झाली आहे, या वृत्ताला संरक्षण मंत्रालयाने दुजोरा दिला आहे. दक्षिण चीन सागरी प्रदेशात त्यामुळे आणखी तणाव निर्माण होण्याची भीती अमेरिकेने बोलून दाखवली आहे.डब्ल्यूयू १४ असे या स्वनातीत अण्वस्त्रवाहक वाहनाचे नाव असून त्याची चाचणी रविवारी करण्यात आली. पीपल्स लिबरेशन आर्मीने गेल्या १४ महिन्यात घेतलेली ही चौथी चाचणी होती.
साऊथ चायन मॉर्निग पोस्टने संरक्षण सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, आमच्या प्रदेशात आम्ही वैज्ञानिक संशोधन करीत आहोत त्यात गैर काहीच नाही.
लष्करी निरीक्षकांच्या मते, बीजिंग ज्या वेगाने चाचण्या घेत आहे त्या बघता चीनच्या अमेरिकेबरोबरच्या प्रादेशिक भांडणाशी त्याचा संबंध आहे व त्या भागात धाक जमवण्यासाठी चीन त्याचा वापर करील.
अमेरिकेच्या वॉशिंग्टन फ्री बिकन या संकेतस्थळाने या चाचणीचे वृत्त प्रथम दिले असून नवीन हल्ला क्षमता वाहन उच्च तंत्रज्ञानावर आधारित आहे. अगदी वातावरणातील स्ट्रॅटोस्फिअपर्यंत जाऊनही ते अण्वस्त्रे टाकू शकते. अमेरिकेची क्षेपणास्त्र संरक्षण क्षमता भेदण्याची ताकद त्याच्यात आहे. डब्ल्यू यू १४ हे अण्वस्त्रधारक वाहन ध्वनीच्या वेगापेक्षा १० पट वेगाने प्रवास करते व त्याचा हा वेग ताशी ७६८० किलोमीटर असतो.यापूर्वीही त्याच्या चाचण्या घेण्यात आल्या असून आताच्या चाचणीत जास्त अचूकता दिसून आली. केंद्रीय लष्करी आयोगाचे उपाध्यक्ष फॅन चँगलाँग हे अमेरिकेत गेले असताना ही चाचणी करण्यात आली आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री अॅशटन कार्टर यांच्याशी ते चर्चा करणार आहेत. फॅन यांची अमेरिकेत वट वाढावी व सौदेबाजीची ताकदही वृद्धिंगत व्हावी यासाठी चीनने ही चाचणी केली असल्याचे सांगण्यात येते. दक्षिण चीन सागरात चीनने जो हस्तक्षेप चालवला आहे तो अमेरिकेला मान्य नाही असे चित्र आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीच्या वतीने अमेरिकेशी वाटाघाटी करताना चीनचे वजन वाढावे यासाठी ही चाचणी करण्यात आल्याचे मत मकाव येथील लष्करी निरीक्षक अँटनी वाँग डॉँग यांनी व्यक्त केले.
अण्वस्त्रवाहक देश
अमेरिका, रशिया, चीन
चीनने केलेल्या चाचण्या
जानेवारी २०१४, ऑगस्ट २०१३, डिसेंबर २०१४ व जून २०१५
वाहून नेता येणारी अण्वस्त्रे- डीएफ २१, डीएफ ३१, डीएफ ४१
कमाल वेग- १० मॅक (१२२३९ कि.मी- ताशी )