गुवाहाटी : चीनचे लष्कर (पीपल्स लिबरेशन आर्मी- पीएलए) अरुणाचल प्रदेशातील आंतरराष्ट्रीय सीमेवर पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याचे काम करत असल्याची माहिती भारतीय लष्कराच्या ईस्टर्न कमांडच्या प्रमुखांनी सोमवारी दिली.

तथापि, सीमेवर उद्भवू शकणाऱ्या कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारतही सतत आपल्या पायाभूत सुविधा आणि क्षमतांमध्ये वाढ करत आहे, असे ईस्टर्न कमांडचे प्रमुख कमांडिंग अधिकारी लेफ्टनंट जनरल आर.पी. कलिता यांनी सांगितले.

‘तिबेट क्षेत्रात प्रत्यक्ष ताबारेषेवर पायाभूत सुविधा विकसित करण्याचे मोठे काम सुरू आहे. चीन सतत त्यांचे रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्गाची संधानता (कनेक्टिव्हिटी) यांचा विकास करत आहे, जेणेकरून परिस्थितीला प्रतिसाद देण्याच्या किंवा सैन्याची हालचाल करण्याच्या अधिक चांगल्या स्थितीत ते असतील,’ असे कलिता पत्रकार परिषदेत म्हणाले.

चीनच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही कारणांसाठी वापरता येतील अशी सीमेवरील खेडी प्रत्यक्ष ताबारेषेनजीक उभारली असल्याचेही कलिता यांनी सांगितले. ‘आम्ही परिस्थितीवर सतत देखरेख ठेवून आहोत. आम्हीदेखील आमच्या पायाभूत सुविधा व क्षमतांचा, तसेच परिस्थिती हाताळण्याच्या यंत्रणेचा श्रेणीसुधार करत आहोत. याने आम्हाला मजबूत स्थितीत आणून ठेवले आहे,’ असे हे अधिकारी म्हणाले.