Xi Jinping strong message to Donald Trump : अमेरिकेने भारताबरोबरच जगातील अनेक देशांवर टॅरिफ लादले आहे, यामुळे अमेरिकेचे अनेक देशांबरोबरचे संबंध ताणले गेले आहेत. यादरम्यान बीजिंग येथे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि उत्तर कोरियाचे किम जोंग उन यांच्या उपस्थितीत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी जगाला त्यांचे लष्करी सामर्थ्य दाखवून दिले आहे. शी यांनी कोणाच्याही दादागिरीला चीन घाबरत नाही असा थेट संदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दिला .
जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी यावेळी देशाच्या विकासाबद्दल देखील विधान केले. “चीनचा उदय अटळ आहे,” असा स्पष्ट इशारा त्यांनी अमेरिकेला दिला.
बीजिंगच्या तियानआनमेन चौकात ५० हजारांहून अधिक लोकांना समुदायाला संबोधित करताना शी जिनपिंग यांनी इशारा दिला की, “आज, मनवजातीसमोर शांतता की युद्ध, चर्चा की संघर्ष, एमेकांचा विजय की झिरो-सम असे पर्याय आहेत.” तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की, आज चीनचे नागरिक हे इतिहासाच्या योग्य बाजूला ठामपणे उभे आहेत.
यावेळी शी जिनपिंग यांनी ओपन-टॉप लिमोझिनमधून सैन्यदल व अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची पाहणी केली, ज्यामध्ये क्षेपणास्त्रे, रणगाडे आणि ड्रोनचा समावेश होता. आकाशात मोठे बॅनर घेतलेले हेलिकॉप्टर्स आणि फायटर जेट्सने उड्डाणे केली.
७० मिनिटे चाललेल्या या सोहळ्याचा शेवट ८० हजार शांततेचे प्रतिक असलेली कबूतरे आणि रंगीबेरंगी फुगे आकाशात सोडून झाला. या सोहळ्याला सुमारे दोन डझन परदेशी नेते देखील उपस्थित होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफच्या मुद्द्यावर अमेरिकेबरोबरचे संबंध ताणले गेले असताना हे देश चीनशी जवळचे संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत.
या कार्यक्रमात सर्वांचे लक्ष हे पुतिन, किम जोंग उन आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष या नेत्यांकडे होते. याबरोबरच आशियातील काही देशांचे नेते देखील उपस्थित होते. या सोहळ्याच्या एका फोटोमध्ये पुतिन आणि किम यांच्याबरोबर बसलेले दिसून आले. या तीन नेत्यांचा हा पहिलाच एकत्र काढण्यात आलेला फोटो आहे, ज्यामधून एकप्रकारे जागतिक राजकारणात अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देणारा इशारा मानला जात आहे.
या सोहळ्यामध्ये १०,००० पेक्षा अधिक सैनिक आणि शेकडो आधुनिक शस्त्रास्त्रांसह संचलन करण्यात आले. ज्यामधून शी जिनपिंग नेतृत्वाखाली चीनची वेगाने वाढत असलेली लष्करी ताकद जगाला पाहायला मिळाली.
यादरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बीजिंगवर जोरदार टीका केली आहे. ट्रम्प यांनी शी जिनपिंग, पुतिन आणि किम यांच्यावर अमेरिकेविरुद्ध कट रचल्याचा आरोप केला. ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवरील पोस्टमध्ये, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात चीनचे स्वातंत्र्य मिळवण्याठी अमेरिकन नागरिकांना मोठी किंमत मोजली होती, असे म्हटले आहे.