Chinese Ambassador To India Issued Warning To US: डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी चिनी आयातीवर १०० टक्के अतिरिक्त कर आणि अमेरिकेत बनवलेल्या क्रिटिकल सॉफ्टवेअरवर कठोर निर्यात निर्बंध लागू केले होते. यानंतर आता भारतातील एका चिनी राजदूताने अमेरिकेला कठोर इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, जर अमेरिका माघार घेतली नाही, तर त्यांचा देश योग्य पद्धतीने प्रत्युत्तर देईल. चीनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नुकतेच सांगितले की, अमेरिकेने “आपल्या चुका सुधाराव्यात,” अन्यथा चीनला आपल्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक पावले उचलावी लागतील.

डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा आहे की, भारत आणि चीनसारखे देश रशियातून कच्चे तेल आयात करत असल्यामुळे रशियाच्या युद्धयंत्रणेला युक्रेनविरोधात लढण्यासाठी निधी मिळत आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून ट्रम्प सातत्याने भारत आणि चीनला लक्ष्य करत आहेत.

ट्रम्प यांचा चीनला इशारा

गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी घोषणा केली होती की, जर चीनने सकारात्मक पावले उचलली नाहीत, तर अमेरिका चिनी आयातीवर ते आधीच भरत असलेल्या टॅरिफपेक्षा दुप्पट टॅरिफ लादतील. चीनवर नवीन टॅरिफ १ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. ट्रम्प यांनी यापूर्वी चिनी वस्तूंवर १५५ टक्के शुल्क लादण्याची घोषणा केली होती.

…तर आम्ही निश्चितच उत्तर देऊ

कोलकाता येथील चिनी कॉन्सुल जनरल झू वेई यांना एका कार्यक्रमात बोलताना अमेरिका-चीन टॅरिफ वॉरबद्दल विचारले असता त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.

“अमेरिका-चीन टॅरिफ मुद्द्यावर चीनची भूमिका अगदी स्पष्ट आहे. आम्हाला कोणताही संघर्ष नको आहे. पण जर आमच्यावर दबाव आणला, तर आम्ही निश्चितच उत्तर देऊ. आम्ही लढू, पण चर्चेसाठी आमचे दरवाजे खुले आहेत. आम्ही पुन्हा एकदा सांगत आहोत की, सहकार्यामुळे दोन्ही देशांना फायदा होतो. आम्ही अमेरिकेला त्यांच्या चुका दुरुस्त करण्याचे आणि समस्या सोडवण्याचे आवाहन करतो. जर तसे झाले नाही, तर चीन त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक पावले उचलेल”, असे वेई यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदींनी आश्वासन दिल्याचा ट्रम्प यांचा दावा

दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शब्द दिल्याचे म्हणत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दावा केला की, भारत वर्षअखेरीस रशियन तेल आयात मोठ्या प्रमाणात कमी करेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी असेही म्हटले आहे की, भारत रशियन तेल आयात टप्प्याटप्प्याने बंद करेल आणि वर्षअखेरीस ती ‘जवळजवळ शून्यावर’ आणेल.