कोलेस्टेरॉल कमी करणारे नवे इंजेक्शन ब्रिटन देशभरातील हृदयविकार रुग्णांना उपलब्ध करून देणार आहे, असे राष्ट्रीय आरोग्य सेवेने म्हटले आहे. हे औषधरूपातील इंजेक्शन वर्षातून दोनदा घेतल्यास शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित राहणार आहे.

‘इनक्लिसिरान’ असे या औषधाचे नाव असून कोलेस्टेरॉल विशिष्ट मर्यादेत ठेवण्यासाठी त्याची मदत होणार आहे. राष्ट्रीय आरोग्य सेवेने सांगितले, की इनक्लिसिरानमुळे पुढील दशकभरात ५५ हजार हृदयविकार व पक्षाधात टळतील व किमान तीस हजार लोकांचे प्राण वाचू शकतील. याबाबत ब्रिटनने स्वित्झर्लंडच्या नोवार्तिस कंपनीशी करार केला असून ब्रिटनमध्ये जास्त कोलेस्टेरॉल असलेले तीन लाख रुग्ण आहेत. हृदयविकाराचा पूर्वेतिहास असलेल्या लोकांना या औषधाचा जीवनरक्षक म्हणून उपयोग होणार आहे. त्यामुळे पुढील तीन वर्षात हृदयविकाराचे प्रमाण घटणार आहे. तसेच हृदयविकाराच्या रुग्णांचे प्रमाण १० लाखांवरून पाच लाखांवर येईल.

राष्ट्रीय आरोग्य सेवेच्या मुख्य कार्यकारी अमंदा प्रिटचर्ड यांनी सांगितले, की राष्ट्रीय आरोग्य सेवा या क्रांतिकारी औषधाचा वापर करून देशातील लोकांना हृदयविकारापासून दिलासा मिळवून देणार आहे. आता हृदयविकारावर या औषधरूपातील इंजेक्शनच्या मदतीने मात करता येईल. त्यासाठी स्वित्झर्लंडच्या नोवार्तिस कंपनीशी केलेला करार हा जगातील अत्यंत महत्त्वाचा करार असून त्यामुळे हृदयविकाराविरोधातील प्रयत्नांना मोठे पाठबळ मिळणार आहे. ब्रिटनमध्ये दर पाच पैकी दोन व्यक्तींना हृदयविकार असून सध्या ६५ लाख लोक कोलेस्टेरॉल कमी करण्याची औषधे म्हणजे स्टॅटिन्स घेत आहेत. नवे औषध किफायतशीर किमतीत उपलब्ध केले जाणार आहे. जगातील मृत्यूंमध्ये हृदयविकार हे एक प्रमुख कारण आहे, त्यामुळे त्यावर उपाय आवश्यकच होता असे नोवार्तिसचे भारतीय वंशाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरसिंहन यांनी म्हटले आहे.