हिंदू किंवा मुस्लिम स्थलांतरितांपैकी तुमचा शत्रू कोण हे निवडा, असे अप्रत्यक्ष आवाहन आसाममधील भाजप नेते हेमंतविश्व सर्मा यांनी जनतेला केले आहे. हेमंतविश्व सर्मा हे आसाम सरकारमधील मंत्री आणि भाजपप्रणित ईशान्य लोकशाही युतीमधील समन्वयक आहेत. आसामच्या राजकारणातील चाणक्य अशी ओळख असलेल्या हेमंतविश्व सर्मा यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्मा भाजपमध्ये प्रवेश केला होता. ते मंगळवारी आसामधील नागरी सुधारणा विधेयकाबाबतच्या विरोधकांच्या आक्षेपांना प्रत्युत्तर देताना बोलत होते.

हिंदुंची लोकसंख्या वाढली नाही तर राम मंदिर कसे उभारणार?- गिरीराज सिंह

यावेळी हेमंतविश्व सर्मा यांनी राज्यातील जनतेला १-१.५ लाख की ५५ लाख स्थलांतरितांपैकी तुमचे शत्रू कोण आहेत, हे ठरवा असे आवाहन केले. तसेच आसाममध्ये हिंदू आणि मुस्लिम स्थलांतरितांमध्ये फरक करणे हे भाजपचे अधिकृत धोरण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जाहीर केलेली स्थलांतरितांची आकडेवारी हिंदू आणि मुस्लिमांची होती का, याबद्दल अधिक बोलण्यास हेमंतविश्व सर्मा यांनी नकार दिला. आसाममधील हिंदू आणि मुस्लिम स्थलांतरितांची अधिकृतरित्या मोजणी झाली नसली तरी राजकीय पक्षांकडून अनेकदा आसाममध्ये तब्बल ५५ लाख बांगलादेशी असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, १-१.५ लाख ही आकडेवारी कोणत्याही संदर्भांशी मेळ खाणारी नाही.

‘हिंदूंचा प्रजननदर असाच कमी राहिला, तर त्यांचे अस्तित्त्वच संपेल’
दरम्यान, हेमंतविश्व सर्मा यांनी याबद्दल माहिती देताना म्हटले की, आपला शत्रू कोण आहे, हे निवडण्याची वेळ आली आहे. १-१.५ लाख की ५५ लाख लोक, यापैकी आपले शत्रू कोण आहेत? , आसामी जनतेसाठी हे निर्णायक वळण येऊन ठेपले आहे. आपल्या हातातून ११ जिल्हे गेले आहेत. हे असेच सुरू राहिले तर २०२१ च्या जनगणनेत आणखी सहा जिल्हे आपल्या हातातून जातील, त्यानंतर २०३१ मध्ये आपण आणखी जिल्हे गमावून बसू, असे सांगत हेमंतविश्व सर्मा यांनी विधेयकाचे जोरदार समर्थन केले.  दरम्यान, २०११च्या जनगणनेनुसार सर्मा यांनी उल्लेख केलेल्या ११ जिल्ह्यांपैकी ९ जिल्हे हे मुस्लिमबहुल आहेत. आसामी जनतेला अल्पसंख्याक करण्याची धमकी देणारे कोण आहेत, असा सवाल सर्मा यांनी विरोधकांना विचारला आहे. आसाममधील नागरिकत्व विधेयकातील सुधारण अंमलात आल्यास पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये छळाचा सामना कराव्या लागणाऱ्या हिंदू, शीख, बुद्ध , जैन आणि पारशी नागरिकांना कोणत्याही अधिकृत कागदपत्रांशिवाय आसामचे नागरिकत्त्व मिळणार आहे. या संदर्भाला धरून बांगलादेशमधून येणाऱ्या स्थलांतरितांमध्ये हिंदू आणि मुस्लिम असा भेद करणे, हे भाजपचे अधिकृत धोरण आहे का, असा प्रश्न हेमंतविश्व शर्मा यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना सर्मा यांनी म्हटले की, होय हे आमचे स्पष्ट धोरण आहे. धर्माच्या आधारावरच या देशांची फाळणी झाली होती. त्यामुळे ही गोष्ट नवीन नाही, असे सर्मा यांनी सांगितले.