Provocative Statements About CJI B. R. Gavai: भारताचे अॅटर्नी जनरल आर. वेंकटरमणी यांना पत्र लिहून भारताचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याची चिथावणी दिल्याचा आरोप करत, मिशन आंबेडकर संघटनेच्या संस्थापकांनी कथाकार अनिरुद्धाचार्य आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अजित भारती यांच्याविरुद्ध फौजदारी अवमान कारवाई सुरू करण्याची परवानगी मागितली आहे. कायद्यानुसार एखाद्या खाजगी व्यक्तीविरुद्ध न्यायालयाचा अवमान करण्याची कारवाई सुरू करण्यासाठी अॅटर्नी जनरल यांची संमती आवश्यक असते.
बी. आर. गवई यांची टिप्पणी
मिशन आंबेडकर या संघटनेचे नेतृत्व करणारे सूरज कुमार बौद्ध यांनी त्यांच्या पत्रात २१ सप्टेंबर रोजी अनिरुद्धाचार्य (अनिरुद्ध राम तिवारी) यांच्या एका व्हिडिओचा उल्लेख केला आहे, ज्यामध्ये त्यांनी हिंदू देवता भगवान विष्णूच्या मूर्तीशी संबंधित एका प्रकरणात सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी केलेल्या टिप्पणीबद्दल धमक्या दिल्या होत्या.
बी. आर. गवई यांच्याबद्दल अनिरुद्धाचार्य यांचे वक्तव्य
“जर तुम्हाला तुमची छाती फाडायची असेल तर मला कळवा”, असे अनिरुद्धाचार्य सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये म्हणताना ऐकू येतात. याबाबत हिंदुस्तान टाईम्सने वृत्त दिले आहे. यावेळी सूरज कुमार बौद्ध यांनी अजित भारती यांनी यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या आक्षेपार्ह विधानांचाही या पत्रात उल्लेख केला आहे.
बी. आर. गवई यांच्याविरोधात चिथावणीखोर पोस्ट
पीटीआयच्या वृत्तानुसार, नोएडा पोलिसांनी मंगळवारी अजित भारती यांचीही चौकशी केली. पण, अजित भारती यांनी फक्त एवढेच सांगितले की, त्यांना त्यांच्या अलीकडील सोशल मीडिया पोस्टच्या संदर्भात समन्स बजावण्यात आले आहे.
पोलिसांनी सांगितले की, अजित भारती यांना प्रथम सेक्टर ५८ पोलीस ठाण्यात आणि नंतर सेक्टर १२-२२ चौकीतील डीसीपी कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आले होते. “एक्सवरील त्यांच्या अलीकडच्या पोस्टबद्दल चौकशीसाठी त्यांना बोलावण्यात आले होते. या घटनेसंदर्भात त्यांना अटक करण्यात आलेली नाही”, असे पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले. चौकशीनंतर अजित भारती यांनी एक्सवर पोस्ट केले की, त्यांना अटक करण्यात आलेली नाही.
बी. आर. गवई यांच्याविरोधात हिंसाचार भडकवण्याच्या उद्देश
सूरज कुमार बौद्ध यांनी त्यांच्या पत्रात अनिरुद्धाचार्य आणि अजित भारती यांच्याबद्दल म्हटले आहे की, “ही विधाने आणि कृती भारताचे सरन्यायाधीश बी. आर. गवई आणि इतर न्यायाधीशांविरुद्ध हिंसाचार भडकवण्याच्या उद्देशाने आहेत. अशा सार्वजनिक चिथावणीचा सूर आणि स्वरूप अत्यंत धोकादायक आहे आणि या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत, ज्यामुळे वाद निर्माण झाले आहेत आणि तणाव वाढला आहे.”
बी. आर. गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न
दरम्यान, सोमवारी (६ ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर दिल्लीतील मयूर विहार परिसरात राहणाऱ्या राकेश किशोर यांनी बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने या हल्ल्यात सरन्यायाधीश बी. आर. गवई यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.