Supreme Court Lawyer CJI Gavai Shoe Attack: सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराची सध्या देशभर चर्चा असून गवईंवरील हल्ला हा संविधानावरचा हल्ला असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील या प्रकाराचा तीव्र निषेध करून संताप व्यक्त केला आहे. या सगळ्या प्रकारावर आता भूषण गवई यांच्या आई कमलताई गवई यांची प्रतिक्रिया समोर आली असून त्यांनी या प्रकाराबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

नेमकं काय घडलं सर्वोच्च न्यायालयात?

सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई एका प्रकरणाची सुनावणी घेत असताना अचानक समोरून राकेश किशोर नावाच्या एका वकिलाने त्यांच्या दिशेनं पायातील बूट भिरकावला. यावेळी सरन्यायाधीशांसमवेत खंडपीठात दुसरे न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन हेदेखील होते. हा प्रकार लक्षात येताच न्यायालयातील सुरक्षारक्षकांनी ताबडतोब राकेश किशोर यांना सरन्यायाधीशांवर बूट फेकण्यापासून अडवलं आणि न्यायालयाच्या बाहेर नेलं. यावेळी वकील राकेश किशोर हे ‘सनातन का अपमान नहीं सहेंगे’ अशा घोषणाही देत होते.

हा प्रकार घडल्यानंतर न्यायालयाच्या खोलीत गडबड उडाली. पण सरन्यायाधीश भूषण गवई यांनी यावेळी प्रसंगावधान राखत खोलीत उपस्थित सर्वांना शांतता राखण्याचं आवाहन केलं. “मला अशा गोष्टींमुळे फरक पडत नाही, तुम्हीदेखील शांत राहा”, असं सरन्यायाधीश यावेळी म्हणाले आणि त्यांनी सुनावणी पुढे सुरू केली.

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आईची प्रतिक्रिया

दरम्यान, एकीकडे सर्वोच्च न्यायालयातील या प्रकारावर राजकीय, सामाजिक वर्तुळातून टीकात्मक प्रतिक्रिया व्यक्त होत असताना दुसरीकडे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई कमलताई गवई यांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे. याआधी कमलताई गवई राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आमंत्रणावरून त्यांच्या दसऱ्याच्या मेळाव्याला जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, अखेर त्यांनी संघाच्या कार्यक्रमाला जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. आता सरन्यायाधीशांवरील बूट हल्ल्यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रियाही चर्चेत आली आहे.

काय म्हणाल्या कमलताई गवई?

कमलताई गवई यांनी प्रसारमाध्यमांमध्ये जारी केलेल्या एका व्हिडीओच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे. “आपण जगा आणि इतरांनाही जगू द्या असं तत्व आहे. पण कायदा हातात घेऊन अराजकता माजवण्याचा या देशात कुणालाही अधिकार नाही. कृपया आपले प्रश्न आपण शांततेनं व संवैधानिक मार्गाने सोडवून घ्यावेत अशी मी सर्वांना विनंती करते”, असं म्हणत त्यांनी आपल्या मागण्यांसाठी घटनात्मक मार्गांचा अवलंब करण्याचं आवाहन केलं आहे.