CJI B R Gavai Slams SC Bar Association: सरन्यायाधीश बीआर गवई यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांच्या संघटनेवर टीका केली. पुढील महिन्यात निवृत्त होत असलेल्या न्यायाधीश बेला एम. त्रिवेदी यांच्यासाठी निरोप समारंभाचे आयोजन न केल्याबद्दल सरन्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली. तसेच अशी भूमिका बार असोसिएशनने घ्यायला नको होती, असेही ते म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बेला त्रिवेदी या ९ जून रोजी निवृत्त होत असल्या तरी शुक्रवारी त्यांचा कामकाजाचा शेवटचा दिवस होता. अमेरिकेत एका कौटुंबिक सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी त्यांना जावे लागणार असल्यामुळे शुक्रवारीच त्यांनी काम थांबवले.

निवृत्त होत असलेले न्यायाधीश त्यांच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी सरन्यायाधीशांबरोबर औपचारिक खंडपीठात सहभागी होत त्यांच्याबरोबर बसतात, अशी सर्वोच्च न्यायालयात प्रथा आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनतर्फे न्यायाधीशांना शेवटच्या दिवशी निरोप समारंभ देण्याचीही प्रथा आहे.

मात्र वकिलांच्या संघटनेने न्यायाधीश त्रिवेदी यांच्या निरोप समारंभाची घोषणा न केल्यामुळे सरन्यायाधीश बीआर गवई आणि न्यायाधीश एजी मसीह यांनी वकिलांच्या संघटनेवर तोंडसुख घेतले. सरन्यायाधीश म्हणाले, “मी थेट बोलण्यावर विश्वास ठेवतो. वकिलांच्या संघटनेने अशी भूमिका घ्यायला नको होती.” तसेच औपचारिक खंडपीठाच्या कामकाजात बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि उपाध्यक्ष रचना श्रीवास्तव यांनी हजेरी लावल्याबद्दल त्यांचे कौतुक सरन्यायाधीशांनी केले.

वकिलांच्या संघटनेने न्यायाधीश त्रिवेदी यांना निरोप समारंभ का दिला नाही, याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र मागच्या वर्षी न्यायाधीश त्रिवेदी यांच्या खंडपीठाने एका प्रकरणात वकिलांची सीबीआयकडून चौकशी करण्याचे आदेश दिले होते. बोगस वकालतनामाचा वापर केल्याबद्दल ही चौकशी केली जाणार होती. न्यायाधीश त्रिवेदी यांच्या निर्णयावर संघटनेने नाराजी व्यक्त केली होती.

सरन्यायाधीश यांच्यानंतर बोलताना न्यायाधीश मसीह म्हणाले, “मला माफ करा, पण हे मला बोलावे लागत आहे. प्रथा-परंपरा यांचा आदर केला पाहिजे. चांगल्या प्रथा या सुरूच राहायला हव्यात. मी न्यायाधीश त्रिवेदी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. मला खात्री आहे की, त्या अनेकांसाठी प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक ठरतील.