CJI BR Gavai Recalls Funny Story Fellow Judge Who Didnt Deliver Judgments: राज्य विधिमंडळांनी मंजूर केलेल्या विधेयकांना संमती देण्यासाठी राष्ट्रपती किंवा राज्यपालांना कालमर्यादा निश्चित करावी का यासंदर्भातील याचिकांवर १० दिवसांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी आपला निर्णय राखून ठेवला. या १० दिवसांमध्ये सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तीवाद झाला.
दरम्यान, सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी यावेळी एक किस्सा सांगितला, ज्यामुळे न्यायालयात एकच हशा पिकल्याचे पाहायला मिळाले. ५ न्यायाधीशांच्या आणि वकिलांच्या खंडपीठाने ब्रेक घेतला, तेव्हा सरन्यायाधीश बी. आर. गवई यांना त्यांच्या जुन्या सहकाऱ्याची आठवण आली आणि म्हणाले, “माझा एक जुना न्यायमूर्ती सहकारी निकाल देणे सोडून सर्व गोष्टी करत असे.”
निकाल देणं सोडून सर्व गोष्टी करायचे
या खंडपीठात सरन्यायाधीश बी. आर. गवई, न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती विक्रमनाथ, न्यायमूर्ती पीएस नरसिंह आणि न्यायमूर्ती एएस चांदुरकर यांचा समावेश होता. सर्व न्यायमूर्ती अचानक आपापसात बोलू लागले, त्यानंतर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले, “मी लिप रीडिंग शिकलो असतो तर बरे झाले असते. जेव्हा आपण युक्तिवाद सादर करत असतो आणि न्यायमूर्ती आपापसात बोलत असतात तेव्हा मी अंदाज लावत राहतो.”
यावर सरन्यायाधीशांनी उत्तर दिले, “गेल्या ३ आठवड्यांपासून जो युक्तीवाद ऐकला त्याबद्दल आम्ही बोलत नव्हतो. हे आमच्या मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती सहकाऱ्यासारखे नाही, जे दीर्घकाळ चालणाऱ्या युक्तिवादादरम्यान चित्र काढायचे, लाकडी कोरीव काम करायचे आणि निकाल देणे सोडून इतर अनेक गोष्टी करायचे.”
त्याची बरोबरी करू शकत नाही
यादरम्यान, सरन्यायाधीशांनी वकिलांच्या वाचनाच्या गतीबद्दल आश्चर्य व्यक्त केले आणि ते म्हणाले की, ते त्याची बरोबरी करू शकत नाहीत. ते म्हणाले, “मी २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती झालो. ६ वर्षांनंतरही, मी दिल्लीतील वकिलांशी ताळमेळ ठेवू शकत नाही, जे पहिले वाक्य वाचतात आणि नंतर दुसऱ्या वाक्याकडे जाण्यापूर्वीच ते १० वे वाक्य वाचत असतात. न्यायमूर्ती नरसिंह वगळता, खंडपीठामधील आमच्यापैकी इतर चौघांना सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांशी ताळमेळ राखणे खूप कठीण जाते.”
ते पुढे म्हणाले, “कधीकधी आम्ही प्रकरणाच्या अभ्यासात पूर्णपणे गुंतून जातो. दाखल केलेले संपूर्ण कागदपत्रे वाचतो, ज्यात ५००० पेक्षा जास्त पृष्ठे असतात.” यावर न्यायमूर्ती नरसिंह म्हणाले, “हा पुढील पिढीच्या वकिलांसाठी एक संदेश आहे, त्यांनी वाचन वगळण्याची सवय लावू नये.”