Rakesh Kishore Attacked CJI B. R. Gavai With Shoes In Supreme Court: सर्वोच्च न्यायालयात काल (सोमवारी) राकेश किशोर नावाच्या वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. सकाळच्या सत्रादरम्यान, त्या व्यक्तीने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या दिशेने बूट फेकला सुदैवाने तो त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही. यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी राकेश किशोर या वकिलाला तात्काळ कोर्टरूममधून बाहेर काढले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
दरम्यान, सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी कोर्टरूममध्ये उपस्थित असलेल्या न्यायालयीन अधिकाऱ्यांना आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना घटनेकडे दुर्लक्ष करण्यास आणि वकील राकेश किशोर यांना इशारा देऊन सोडून देण्यास सांगितले.
सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावरील हल्ल्याच्या प्रयत्नाविरोधात देशभरात संताप व्यक्त होत आहे. अशात, यातील आरोपी वकील राकेश किशोर यांची मागील काळातील विविध प्रकरणे समोर येऊ लागली आहेत.
ज्येष्ठ नागरिकावर हल्ला केल्याचा आरोप
राकेश किशोर दिल्लीतील मयूर विहार परिसरात राहतात. ते राहत असलेल्या सोसायटीतील रहिवाशांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, ते सहा वर्षांपूर्वी सोसायटीचे अध्यक्ष झाले होते. सोसायटीच्या सदस्यांनी दावा केला की, त्या कालावधीत त्यांनी राकेश किशोर यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी दाखल केल्या आहेत, ज्यात नोव्हेंबर २०२१ मध्ये एका ज्येष्ठ नागरिकावर झालेल्या कथित हल्ल्याशी संबंधित तक्रारीचाही समावेश आहे. पण, दिल्ली पोलिसांच्या मते, राकेश किशोर यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही.
बार कौन्सिल ऑफ इंडियाने केले निलंबन
राकेश किशोर यांनी २००९ मध्ये दिल्ली बार कौन्सिल मध्ये नोंदणी केली होती. ते मयूर विहार फेज १ मध्ये राहतात. सोमवारच्या घटनेनंतर लगेचच बार कौन्सिल ऑफ इंडियाने किशोर यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. बीसीआयने त्यांना भारतातील कोणत्याही न्यायालय, न्यायाधिकरण किंवा प्राधिकरणासमोर हजर राहण्यास किंवा प्रॅक्टिस करण्यास मनाई केली आहे. राकेश किशोर यांना त्यांच्याविरुद्धची कार्यवाही का सुरू ठेवू नये हे स्पष्ट करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. बीसीआयने असेही म्हटले आहे की त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई सुरू केली जाईल.