CJI Sanjiv Khanna on Bar and Bench : सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदावरून निवृत्त होत असलेले भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या सन्मानार्थ न्यायालयीन कामकाजादरम्यान न्यायपालिकेने वेळ काढून त्यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता. मंगळवारी सायंकाळी हा कार्यक्रम पार पडला. अॅटर्नी जनरल, सॉलिसिटर जनरल यांच्यापासून ते सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकिलांपर्यंत अनेक दिग्गज, तसेच नायपालिकेशी संबंधित विविध मान्यवर या निरोप समारंभाला हजर होते. यावेळी सर्वांनी खन्ना यांचं कौतुक करत त्यांना हसतमुखाने निरोप दिला.
अॅटर्नी जनरल आर. वेकंटरमणी यांनी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी आजवर दिलेल्या निकालांचे, त्यांच्या स्पष्टतेचे व खन्ना यांच्या साधेपणाचे कौतुक केले. वेंकटरमणी म्हणाले, “सरन्यायाधीश संजीव खन्ना हे नेहमीच न्यायपालिकेचे स्वातंत्र्य व संस्थात्मक अखंडता कायम राहावी यासाठी प्रयत्नशील होते.” तर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरन्यायाधीश खन्ना यांच्या स्पष्ट निकालांचं कौतुक केलं. महेता म्हणाले, “सरन्यायाधीश नेहमीच सर्वांचं म्हणणं ऐकून घेत आले आहेत.”
संजीव खन्ना यांनी खरोखर न्यायव्यवस्थेचं प्रतिनिधित्व केलं : कपिल सिब्बल
तर, ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल म्हणाले, “कायद्याची अशी कुठलीच शाखा नाही जिथे तुमच्या विचारांची स्पष्टता दिसली नाही. तुम्ही नेहमीच खंडपीठाच्या बाजूने असल्याचं दिसलं. तरुण वकिलांना प्रोत्साहन देणे, त्यांना व्यासपीठावर येऊन युक्तिवाद करण्यास प्रेरित करणे हे न्यायाधीशाचे सर्वोत्तम गुण खन्ना यांच्यात आहेत. त्यांनी खरोखर न्यायव्यवस्थेचं प्रतिनिधित्व केलं आहे.”
कपिल सिब्बल म्हणाले, “मी बऱ्याचदा न्यायालयात तयारी न करता आलेल्या वकिलांवर संतापतो. मात्र संजीव खन्ना खूप संयम बाळगायचे. ते आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडत आले आहेत. मग ते न्यायालयीन कामकाज असो अथवा प्रशासकीय काम असेल”. तर, न्यायमूर्ती कुमार यावेळी म्हणाले, “उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती असताना संजीव खन्ना यांनी दिलेले अनेक निकाल हे अत्यंत अभ्यासू होते. आम्ही त्यांच्याकडून व्यावहारिकता शिकलो. त्याबद्दल त्यांचे आभार.”
लोकांचा विश्वास कमवावा लागतो : खन्ना
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सरन्यायाधीश संजीव खन्ना म्हणाले, मी हा कार्यक्रम पाहून, कौतुक ऐकून, सगळी भाषणं ऐकून भारावून गेलो आहे. माझ्याकडे खूप आठवणी आहेत ज्या कायम राहतील. तुम्ही एकदा का वकील झालात की वकीलच राहता. न्यायव्यवस्थेवर जनतेचा विश्वास आहे. तो असाच मिळवता येत नाही. तो कमवावा लागतो. भारतातील न्यायपालिकेने तो कमावला आहे. बार आणि बेंचच्या (वकील व न्यायाधीश) प्रत्येक सदस्याला तसं काम करावं लागतं. वकील व न्यायाधीशांनी मिळून केलेल्या चांगल्या कामामुळे तो विश्वास प्राप्त करता येतो.”
संजीव खन्ना वकिलांना उद्देशून म्हणाले, “तुम्ही (बार/वकील) विवेकाचे रक्षक आहात. त्यामुळेच तुमची जबाबदारी देखील मोठी आहे.” दरम्यान, त्यांच्या उत्तराधिकाऱ्याबाबत म्हणजेच पुढच्या सरन्यायाधीशांबाबत संजीव खन्ना म्हणाले, बी. आर. गवई हे उत्कृष्ट न्यायाधीश आहेत. ते ही संस्था, तिचे मूलभूत अधिकार व कायद्याची मूलभूत तत्वे जपतील, असा मला विश्वास आहे.”