उत्तरप्रदेशमध्ये एक निंदणीय अशी घटना समोर आली आहे. १२ वीच्या कक्षेत शिकत असलेल्या विद्यार्थ्याला तरूणांनी मारहाण केली आहे. यानंतर एका तरूणानं विद्यार्थ्यावर तोंडावर लघुशंका केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी विद्यार्थ्याच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील एकास अटक करण्यात आली आहे.

अवि शर्मा, आशिष मलिक, राज आणि मोहित ठाकूर आणि अन्य अशी गुन्हा दाखल झालेल्या तरूणांची नावे आहेत. दरम्यान, आशिष मलिकला १३ नोव्हेंबरलाही मारहाण प्रकरणी अटक केली होती.

हेही वाचा : आधी चाकूने केले वार, मग मृतदेहाशेजारी नाचू लागला तरुण; थरकाप उडवणारी घटना CCTV मध्ये कैद

नेमकं प्रकरण काय?

उत्तरप्रदेशातील मेरट शहरात ही घटना घडली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत विद्यार्थ्याला काही तरूण मारहाण करताना दिसत आहेत. तर, दोघेजण या मारहाणीचा व्हिडीओ रेकॉर्ड करत आहेत. विद्यार्थी विनंती करत असतानाच एक तरूणाने त्याला पाठीत आणि डोक्यावर मारहाण केली. तर, आणखी एका व्हिडीओत दुसरा तरूण विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर लघुशंका करताना दिसत आहे.

पीडितेच्या वडिलांनी सांगितलं, “मुलगा नातेवाईकांच्या घरून परत येत असताना तरूणांच्या टोळक्यानं त्याचं अपहरण केलं. त्यानंतर मुलाला अज्ञातस्थळी नेऊन मारहाण केली.”

विद्यार्थी घरी न आल्याने काळजीत असलेल्या कुटुंबीयांनी रात्रभर त्याचा शोध घेतला. पण, दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आल्यानंतर विद्यार्थ्यानं घडलेला सर्व प्रसंग कुटुंबीयांना सांगितला. यानंतर कुटुंबीयांनी तरूणांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. पण, पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नसल्याचा आरोप वडिलांनी केला. १६ डिसेंबरला कुटुंबीयांनी पुन्हा पोलीस ठाणे गाठलं. तेव्हा, पोलिसांनी तरूणांविरोधात गुन्हा दाखल केला. पण, अपहरणाचे कलम सोडून अन्य कलमे तरूणांवर लावल्याचा आरोप कुटुंबीयांनी पोलिसांवर केला आहे.

हेही वाचा : Tinder Dating App मुळे २८ वर्षीय तरुणाची क्रूर हत्या, जाणून घ्या काय घडलं?

मारहाण करणारे तरूण पीडित विद्यार्थ्याचे मित्र आहे. पण, त्यांच्यात कुठलाही वाद नसल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं.

याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी पीयूष सिंह यांनी सांगितलं, “एका तरूणावर हल्ला करत त्याच्यावर लघूशंका करण्यात आली. वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करत, एकास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.”