पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात दक्षिण मुंबईचे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांची वर्णी लागणार आहे. शिवसेनेत तीन-चार टर्म भूषवलेले खासदार असूनही अरविंद सावंत यांना दुसऱ्याच टर्ममध्ये मंत्रीपद मिळणार आहे. शिवसेनेचे प्रवक्ते असलेल्या अरविंद सावंत यांची अभ्यासू, हुशार नेत्यांमध्ये गणना होते. अरविंद सावंत यांचा मंत्रिपदापर्यंतचा प्रवास सोपा नाही. सुरुवातीच्या दिवसांमध्ये त्यांनी शिक्षक म्हणून काम केले आहे. शपथविधीसाठी अरविंद सावंत आज सकाळी आपल्या कुटुंबासह दिल्लीला रवाना झाले. केंद्रीय मंत्रीपदापर्यंतचा सावंत यांचा प्रवास संघर्षमय आहे. शिक्षक, कामगार नेते ते केंद्रीय मंत्री असा सावंत यांचा प्रवास आहे.
शिवसेनेत गटनेत्यापासून विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या. आमदार-खासदार आणि आता मंत्रीपदापर्यंत पोहोचणारे अरविंद सावंत अत्यंत अभ्यासू, कष्टाळू आणि हुशार नेते म्हणून ओळखले जातात. २०१४ पासून दक्षिण मुंबई मतदार संघामध्ये केलेले काम पाहून पुन्हा एकदा जनतेने त्यांना निवडून दिले.
जवळपास ३० वर्षे एमटीएनएलमध्ये कामगार नेते म्हणून काम करणारे अरविंद सावंत यांनी सुरुवातीला शिक्षक म्हणून काम केले आहे. प्राचार्य वामनराव महाडिक यांच्या क्लासेसमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना त्यांनी शिकवले. एमटीएनएलमध्ये त्यांनी तब्बल तीस वर्षे कामगार संघाचे अध्यक्षपद भूषवलं आहे. या काळात त्यांना ‘सर्वोत्कृष्ट युनियन लीडर’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
६८ वर्षीय सावंत मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आले. सर्वसामान्य कुटुंबातून आलेले सावंत यांनी सुरुवातीपासूनच माणसं जोडली. १९९५ मध्ये सावंत यांनी ‘एमटीएनएल’मधून स्वेच्छानिवृत्ती घेऊन स्वतःला पूर्ण वेळ राजकारणात झोकून दिले. १९६८ मध्ये सावंत यांनी सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून काम सुरू केलं. सध्या ते शिवसेनेचे उपनेते, खासदार आणि प्रवक्ते आहेत. ७० च्या दशकात संपर्कप्रमुख म्हणून त्यांनी राज्याचा कोपरा नि कोपरा पिंजून काढला. ‘बाळासाहेबांचा दूत’ म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. २०१४ मध्ये खासदार म्हणून संसदेत गेल्यानंतर सभागृहात कोणताही प्रश्न मांडताना ते त्याचा आधी संपूर्ण अभ्यास करयाचे. त्यामुळेच एक अभ्यासू खासदार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली.
अरविंद सावंत यांचा थोडक्यात प्रवास
– १९६८ साली गटप्रमुख म्हणून कारकिर्दीस सुरुवात
– १९६९ साली सीमा आंदोलनात महत्वाची भूमिका
– एमटीएनएलमध्ये कामगार संघाचे तीस वर्षं त्यांनी अध्यक्षपद
– महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेचे सरकार आल्यानंतर १९९६ मध्ये सावंत यांनी विधानपरिषदेवर निवडून जाण्याची संधी मिळाली.
– २०१० मध्येही ते विधानपरिषदेचे आमदार होते.
– एक अभ्यासू आमदार म्हणून ओळख
– २०१४ मध्ये लोकसभेसाठी प्रमोशन
– २०१९ मध्येही दणदणीत विजय
– ‘युनो’त आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व केले.