केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता पुरस्कारांमध्ये इंदूरला सलग पाचव्यांदा भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले, तर छत्तीसगडने राज्य श्रेणीमध्ये पहिले स्थान कायम राखले. १००हून अधिक शहरी स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला देशातील दुसरे आणि तिसरे स्वच्छ राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे.महाराष्ट्राला इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक एकूण ९२ पुरस्कार मिळाले आहेत, त्यापाठोपाठ छत्तीसगडने ६७ पुरस्कार मिळवले आहेत. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालयाने शनिवारी या वर्षी केलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षणा’चे निकाल जाहीर केले.

‘स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार, २०२१’च्या ‘सर्वात स्वच्छ शहर’ श्रेणीमध्ये अनुक्रमे सुरत आणि विजयवाडा यांनी दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले. इंदूर आणि सुरतने ‘स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०२१’मध्ये आपले स्थान कायम ठेवले असले तरी, नवी मुंबईने मागील वर्षीचे तिसरे स्थान गमावले असून या वर्षी चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

सर्वेक्षणांतर्गत ‘कचरामुक्त शहर श्रेणीत’, इंदूर, सुरत, नवी दिल्ली नगर परिषद, नवी मुंबई, अंबिकापूर, म्हैसूर, नोएडा, विजयवाडा आणि पाटण या एकूण नऊ  शहरांना पंच तारांकित शहरांचे मानांकन देण्यात आले आहे. तर १४३ शहरांना तीन तारांकित शहरे म्हणून मानांकन देण्यात आले आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी येथे एका कार्यक्रमात केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकासमंत्री हरदीप सिंग पुरी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान केले.

देशव्यापी स्वच्छता सर्वेक्षणात, २८ दिवसांत ४,३२० शहरांचा समावेश करण्यात आला आहे, ४.२ कोटी पेक्षा जास्त लोकांनी त्यांचा अभिप्राय नोंदवला.

’ वाराणसीला ‘सर्वात स्वच्छ गंगा शहर’ म्हणून गौरविण्यात आले आहे, तर बिहारचे मुंगेर आणि पाटणा यांना श्रेणीत दुसरे आणि तिसरे स्थान मिळाले आहे.

’ स्वच्छ सर्वेक्षण २०२१चा भाग म्हणून भारताच्या गुणवत्ता परिषदेने ९१ गंगा शहरांचे मूल्यांकनदेखील केले होते, हे मूल्यांकन मार्च २०२१ मध्ये झाले आणि एकूण ५८८ घाट आणि ९१ गंगा शहरांचा समावेश करण्यात आला. 

’ १०० पेक्षा कमी शहरी स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या राज्यांच्या श्रेणीमध्ये, झारखंड प्रथम क्रमांकावर आहे, त्यानंतर हरियाणा आणि गोवा आहे.

’ इंदूर, सुरत, विजयवाडा, नवी मुंबई, नवी दिल्ली, अंबिकापूर, तिरुपती, पुणे, नोएडा आणि उज्जैन ही एक लाखांहून अधिक लोकसंख्या असलेली १० सर्वात स्वच्छ शहरे आहेत. याच श्रेणीत लखनऊ या यादीत तळाशी आहे.

’ महाराष्ट्रातील विटा हे एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेले सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे, त्यानंतर लोणावळा आणि सासवड यांचा क्रमांक लागतो.

’ इंदूर, नवी मुंबई, नेल्लोर आणि देवास ‘सफाईमित्र सुरक्षा आव्हान’ श्रेणीत अव्वल कामगिरी करणारे शहरे ठरली आहेत. १०-४० लाख लोकसंख्येच्या श्रेणीत नवी मुंबईने भारतातील ‘सर्वात स्वच्छ मोठे शहर’ म्हणून पहिले स्थान मिळवले आहे.

’ कॅण्टोन्मेंट बोर्डाच्या श्रेणीमध्ये अहमदाबादला सर्वात स्वच्छ शहर म्हणून मानांकन देण्यात आले, त्यानंतर मेरठ आणि दिल्लीचा क्रमांक लागतो.

राज्यात नवी मुंबई सर्वात स्वच्छ शहर

‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’मध्ये नवी मुंबईला १० ते ४० लाख लोकसंख्येच्या देशातील मोठ्या शहरांमध्ये सर्वात स्वच्छ शहराचा बहुमान मिळाला आहे. नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे आयोजित विशेष समारंभात केंद्रीय नगर विकास व गृहनिर्माण मंत्री हरदीपसिंह पुरी यांच्या हस्ते महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी हा सन्मान स्वीकारला. नवी मुंबई महानगरपालिकेला आणखी तीन सन्मान मिळाले आहेत. यात ‘सफाईमित्र सुरक्षा आव्हान’ अभियानात नवी मुंबई देशातील व्दितीय क्रमांकाचे शहर ठरले आहे. तसेच ‘कचरामुक्त शहरांमध्ये’ नवी मुंबई महानगरपालिकेने ‘पंचतारांकित मानांकन’ कायम राखले आहे. तसेच हागणदारीमुक्त शहरांच्या श्रेणीतील (ओडीएफ) ‘वॉटरप्लस’ या सर्वोच्च मानांकनाने सन्मानित करण्यात आले. हे सर्वोच्च मानांकन मिळविणाऱ्या देशातील ९ शहरांमध्ये नवी मुंबई हे महाराष्ट्र राज्यातील एकमेव शहर आहे.

मुंबई महानगरपालिकेला घनकचरा व्यवस्थापनातील प्रथम पुरस्कार

स्वच्छ सर्वेक्षण २०२१ स्पर्धेमध्ये घनकचरा व्यवस्थापनातील नावीन्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार बृहन्मुंबई महानगर पालिकेला प्रदान करण्यात आला आहे.चाळीस लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या मोठ्या शहरांच्या श्रेणीत हा पुरस्कार मुंबई महानगरपालिकेने पटकावला आहे. नवी दिल्ली मध्ये विज्ञान भवन येथे शनिवारी झालेल्या समारंभात, गृहनिर्माण आणि नगर विकास खात्याचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी हा पुरस्कार प्रदान केला. मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त संगीता हसनाळे, उपायुक्त भाग्यश्री कापसे, प्रमुख अभियंता अशोक यमगर, कार्यकारी अभियंता (स्वच्छ भारत अभियान) अनघा पडियार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. वार्षिक सरासरी सुमारे ६ हजार १०० मेट्रिक टन घनकचऱ्याचे व्यवस्थापन मुंबईत केले जाते.