कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ईडी कोठडीत १ एप्रिलपर्यंत दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने वाढ केली आहे. कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात केजरीवाल यांना २१ मार्च रोजी ईडीकडून अटक करण्यात आली होती. यानंतर न्यायालयाने त्यांना २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. आज त्यांची ईडी कोठडी संपली होती. यानंतर अरविंद केजरीवाल यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांच्या कोठडीत वाढ केली.
अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण घोटाळा प्रकरणात चौकशीसाठी ईडीने तब्बल ९ वेळा समन्स बजावले होते. मात्र, ईडीने ९ वेळा समन्स देऊनही केजरीवाल यांनी चौकशीला जाणे टाळले. यानंतर अखेर ईडीकडून केजरीवाल यांच्यावर अटेकची कारवाई करण्यात आली. दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात ईडीकडून गेल्या काही महिन्यांपासून तपास सुरू असून केजरीवाल यांच्याआधी आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांनादेखील अटक करण्यात झाली होती. सध्या मनीष सिसोदिया हे तुरुंगात आहेत.
हेही वाचा : अरविंद केजरीवाल यांना दिलासा, मुख्यमंत्रिपदावरुन हटवण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयाने फेटाळली
केजरीवाल यांनी न्यायालयात स्वत: मांडली बाजू
अरविंद केजरीवाल यांनी न्यायालयात स्वत:च आपली बाजू मांडली. मद्य धोरण घोटाळा प्रकरणात आपल्याला गोवण्यात आल्याचा आरोप यावेळी केजरीवाल यांनी केला. केजरीवाल यांनी बाजू मांडल्यानंतर ईडीने स्पष्टीकरण देत केजरीवाल यांच्या कोठडीत आणखी ७ दिवसांची वाढ करण्याची मागणी केली होती.
अरविंद केजरीवाल यांना दिलासा
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रिपदावरुन हटविण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र, मुख्यमंत्रिपदावरुन हटवण्यासाठीची ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर त्यांनी तुरुंगातून सरकार चालविणार असल्याची भूमिका घेतली असून त्यांच्या या भूमिकेला अनेकांनी विरोध केला आहे.