लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यासाठी प्रचाराची धामधूम सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांवर टीकेच्या फैरी झडत आहेत. तसेच आपल्याच पक्षाचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी नेत्यांनी कंबर कसली आहे. सातव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी प्रचार सुरू असून बिहारमधील दनियावा लोकसभा मतदारसंघातील एका प्रचार सभेला संबोधित करत असताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलेल्या एका विधानाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या सभेत बोलताना इंडिया आघाडी आणि लालू प्रसाद यादव यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या कामाचं कौतुक केलं. मात्र, कौतुक करत असताना ते भलतंच बोलून गेले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, हीच आमची इच्छा”, असं विधान नितीश कुमार यांनी केलं. मात्र, त्यानंतर आपली चूक लक्षात येताच त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.

हेही वाचा : ‘इंडिया आघाडी’कडून राज्यघटनेच्या पुनर्लेखनाची योजना; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपाबरोबरची युती तोडत राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) पक्षाबरोबर युती करत बिहारमध्ये सरकार स्थापन केलं होतं. मात्र, त्यानंतर पुन्हा काही महिन्यांनी राष्ट्रीय जनता दल पक्षाबरोबरची युती तोडत त्यांनी पुन्हा भाजपाबरोबर जात बिहारमध्ये सत्ता स्थापन केली. बिहारच्या राजकारणात मागील वर्षभरात अनेक घडामोडी घडल्या. आता लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा पक्ष एनडीएबरोबर आहे. त्यामुळे ते एनडीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. अशाच एका सभेत बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या विधानाची चांगलीच चर्चा होत आहे.

मुख्यमंत्री नितीश कुमार काय म्हणाले?

“बिहारमध्ये आम्ही सर्व ४० जागा आणि देशात ४०० जागा जिंकणार आहोत. त्यामुळे नरेंद्र मोदी पुन्हा मुख्यमंत्री होतील, म्हणजे देशाचा आणि बिहारचा विकास होईल. विरोधकांनी काहीही विकासकामे केली नाहीत. त्यांच्या काळात सांयकाळी लोक घाबरून घराबाहेर पडायचे नाहीत. त्यांना (आरजेडी) संधी मिळाली. मात्र, त्यांनी त्याचा काही उपयोग न करता काहीही कामे केली नाहीत”, अशी टीका नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यादव यांच्यावर नाव न घेता केली.