CM Yogi Adityanath on Disha Patani House Firing : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौमध्ये आयोजित एका कार्यक्रमात भाषण करताना बरेली येथील पोलीस चकमकीवर भाष्य केलं. बरेली येथे बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी हिच्या घरावर झालेल्या गोळीबाराप्रकरणी आदित्यनाथ यांनी टिप्पणी केली. ते म्हणाले, “तुम्ही पाहिलंच असेल, महिलांसंबंधीच्या गुन्ह्यांमधील एक गुन्हेगार बाहेर आला होता. तो मारीचप्रमाणे घुसला होता. मात्र, पोलिसांच्या गोळ्यांनी त्याच्या शरिराची चाळण केली तेव्हा मात्र तो ओरडू लागला होता.”
योगी आदित्यनाथ म्हणाले, “तुम्ही काल पाहिलं असेल महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या प्रकरणात सहभागी एक आरोपी बाहेर आला होता. तो मारीचप्रमाणे आपल्या राज्यात घुसला होता. परंतु, पोलिसांना त्याचा पत्ता मिळाला. त्यानंतर झालेल्या चकमकीत पोलिसांच्या गोळ्यांनी त्याच्या शरिराची चाळण केली. तेव्हा तो म्हणत होता, ‘साहेब, मी चुकून उत्तर प्रदेशच्या सीमेत घुसलो. मी यापुढे कधीही अशी हिंमत करणार नाही.’ आपल्या राज्यात कोणी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत असेल, महिलांच्या सुरक्षेत अडथळे आणत असेल तर त्यांनी या घटनेतून धडा घ्यावा.”
योगी आदित्यनाथ यांना गुन्हेगारांना इशारा
योगी आदित्यनाथ म्हणाले, “सशक्त नारी, समृद्ध प्रदेश हे आपलं ब्रीद आहे. ‘मिशन शक्ती’ या आपल्या मोहिमेचाच हा एक भाग आहे. शाळा-कालेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थिनी, ऑफिसला जाणाऱ्या महिलांची सुरक्षा सुनिश्चित करणं हे गृहविभागाचं प्रमुख कर्तव्य आहे. परवापासून (२२ सप्टेंबर) शारदीय नवरात्रोत्सव, जगत्जननी माँ भगवतीचा उत्सव सुरू होत आहे. जर कुठल्या व्यक्तीने सुरक्षेच्या बाबतीत अडथळा आणला किंवा तशा उद्देशाने आपल्या राज्यात कोणी आला असेल तर त्याचा बंदोबस्त करण्याची तयारी करण्यात आली आहे.”
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी पोलीस चकमकीत ठार
बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर ११ सप्टेंबर रोजी रात्री गोळीबार झाल्याची घटना समोर आली होती. उत्तर प्रदेशातील बरेली या ठिकाणी सिव्हिल लाईन्स परिसरात ही घटना घडली होती. या घटनेनंतर या प्रकरणातील हल्लेखोरांचा पोलिसांकडून तपास चालू होता. दरम्यान, या गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली. पोलीस चकमकीत दोन संशयित हल्लेखोरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.