तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी भाजप डीएमडीकेसमवेत आघाडी करणार का, याबाबत अनिश्चिततेचे वातावरण असतानाच भाजपचे अध्यक्ष अमित शहा बुधवारी राज्याच्या दौऱ्यावर येत असून ते राजकीय परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
कांची पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांच्यासमवेत शहा एका कार्यक्रमाला हजर राहणार असून ते राज्यातील भाजपच्या नेत्यांशीही चर्चा करणार आहेत. राज्यातील राजकीय स्थितीचा आढावा शहा घेणार असले तरी ते डीएमडीकेचे संस्थापक विजयकान्त यांची भेट घेणार आहेत किंवा नाही याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही.
डीएमडीकेने निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिल्याने आणि विजयकान्त यांनी भाजपशी आघाडी करण्याबाबत संभ्रम निर्माण करणारे संकेत दिल्याने संदिग्धता आहे.
काँग्रेस-द्रमुक यांच्यात लवकरच जागावाटप चर्चा
तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीत जागावाटप ठरविण्यासाठी काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वाखालील नेत्यांचे शिष्टमंडळ द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांच्याशी येत्या एक-दोन दिवसांत चर्चा करणार आहेत. आझाद आणि वासनिक येत्या एक-दोन दिवसांत करुणानिधी यांच्याशी काँग्रेसची इच्छा असलेल्या जागांबाबत चर्चा करणार आहेत, असे तामिळनाडू काँग्रेसचे अध्यक्ष ईव्हीकेएस इलनगोवन यांनी सांगितले.श्रीलंकेतील तामिळींच्या प्रश्नावरून २०१३ मध्ये दोन्ही पक्षांनी वेगळी वाट धरली होती. गेल्या महिन्यात आझाद यांनी करुणानिधी यांची भेट घेतली आणि नात्याचे पुनरुज्जीवन केले.