उद्योगपती बिर्ला, माजी कोळसा सचिव आणि थेट पंतप्रधानांवर आरोपाची राळ उडविणाऱ्या कोळसा घोटाळ्याच्या तपासाचा स्थिती अहवाल केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) येत्या २२ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयासमोर सादर करणार आहे.
उच्चस्तरीय सूत्रांनुसार, आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमारमंगलम् बिर्ला आणि माजी कोळसा सचिव पी. सी. पारख यांच्या विरोधात नव्याने दाखल झालेल्या प्राथमिक अहवालाची माहिती सर्वोच्च न्यायालयास देण्यात येणार आहे. आजवर सीबीआयतर्फे १४ प्राथमिक माहिती अहवाल नोंदविण्यात आले आहेत. सीबीआयतर्फे कोळसा घोटाळ्यातील गहाळ फायलींबाबतही माहिती देण्यात येणार आहे.  
दरम्यान, हिंदाल्कोला झालेल्या वाटपाची जबाबदारी पंतप्रधानांनी स्वीकारल्याबद्दल भारतीय जनता पक्षाने समाधान व्यक्त केले आहे. आता २००६ ते २००९ या कालावधीत खाणमंत्री असताना झालेल्या गैरवाटपाची जबाबदारीही सिंग स्वीकारतील काय, असा सवाल पक्षप्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी केला आहे.    
अग्रलेख – मनमोहन महाजन