कोळसा खाणवाटप घोटाळाप्रकरणी विरोधी पक्षांनी केलेल्या टीकेनंतर जवळपास १० दिवसांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आपले मौन सोडले. आपण कायद्यापेक्षा मोठे नाही त्यामुळे कोळसा घोटाळ्यात केवळ सीबीआयच नव्हे तर कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरे जाण्याची आपली तयारी आहे कारण कोणतीही माहिती दडवून ठेवण्याची आपली इच्छा नाही, असे डॉ. सिंग यांनी स्पष्ट केले.
कोळसा खाणवाटप घोटाळ्याप्रकरणी प्रसिद्ध उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला आणि कोळसा खात्याचे माजी सचिव पी. सी. परख यांच्याविरुद्ध सीबीआयने एफआयआर नोंदविल्यानंतर विरोधी पक्षांनी पंतप्रधानांवर सातत्याने हल्ला चढविला होता. त्यानंतर प्रथम पंतप्रधानांनी या प्रश्नावरील मौन सोडले.
आपण कायद्यापेक्षा मोठे नाही, सीबीआय अथवा कोणत्याही यंत्रणेला या बाबत चोकशी करावयाची असल्यासोपली तयारी आहे, आपल्याला कोणतीही माहिती दडवून ठेवायची इच्छा नाही, असे डॉ. सिंग यांनी चीनहून परतताना विमानात पत्रकारांना सांगितले. ओदिशातील हिंदाल्को कंपनीला कोळसा खाण वाटप करण्यात आले होते तो निर्णय योग्य होता, त्यामध्ये काहीही गैर नाही, असे स्पष्टीकरण पंतप्रधआनांच्या कार्यालयातून देण्यात आले होते. त्याबाबत पंतप्रधानांना पत्रकारांनी प्रश्न विचारले. कोळसा खाण वाटपाच्या वेळी डॉ. सिंग यांच्याकडेच कोळसा खात्याचा कारभार होता त्यामुळे त्यांनी चौकशीला सामोरे गेले पाहिजे, असे विरोधी पक्षांचे म्हणणे होते.