Coldrif Cough Syrup Row Tamil Nadu vs Madhya Pradesh Govt : कफ सिरपच्या दुष्परिणामाने मृत्यू होणाऱ्या मुलांची संख्या वाढत आहे. या प्रकरणातील बळींची संख्या आता २३ वर पोहोचली आहे. बुधवारी रात्री आणखी एका तीन वर्षीय मुलाचा नागपुरात मृत्यू झाला. तर, गुरुवारी पहाटे एका मृत्यूची नोंद झाली आहे. या प्रकरणी मध्य प्रदेश पोलिसांनी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) ‘कोल्ड्रीफ’ या औषधाची निर्मिती करणाऱ्या तमिळनाडू येथील श्रेसन फार्मा कंपनीचा मालक रंगनाथन गोविंदन याला चेन्नईतून अटक केली. तसेच कांचीपुरम येथील कंपनीचा कारखाना देखील सील केला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर मध्य प्रदेशमधील भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार व तमिळनाडूमधील द्रमुक (द्रविड मुन्नेत्र कळघम) सरकारमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. दोन्ही बाजूच्या लोकांनी एकमेकांवर आरोग्य विभागाकडे दुर्लक्ष, तपासण्यांमधील त्रुटी, विषारी औषधांचं उत्पादन, चाचण्यांमधील नियमांचं उल्लंघन केल्याचे आरोप केले आहेत.
मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा तमिळनाडू सरकारवर गंभीर आरोप
लहान मुलांच्या मृत्यूप्रकरणी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी तमिळनाडूवर खापर फोडलं आहे. यादव म्हणाले, “श्रेसन फार्मास्युटिकल्स या तमिळनाडूमधील औषध उत्पादक कंपनीला विषारी कोल्ड्रीफ सिरपचं उत्पादन करण्याची परवानगी दिली गेली. तिथे कारखाना चालू ठेवायची परवानगी दिली गेली, निर्मिती प्रक्रियेत चुकांची पनरावृत्ती होत होती तरी त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. आम्ही आमच्या ड्रग कंट्रोलर व सहाय्यक ड्रग कंट्रोलरला या निष्काळजीपणामुळे निलंबित केलं आहे. परंतु, तमिळनाडू सरकारने या कंपनीला औषधात ब्रेक फ्लुइडचे रसायन मिसळण्याची परवानी का दिली याचं उत्तर द्यावं.
तमिळनाडूचं उत्तर
यावर तमिळनाडूचे आरोग्य मंत्री एमए सुब्रमणियन म्हणाले, “या सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोल हा विषारी औद्योगिक घटक आढळल्याचं निदर्शनास आल्यानंतर आमच्या सरकारने तातडीने केंद्र सरकार व मध्य प्रदेश सरकारच्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली होती.”
कंपनीचं उत्पादन युनिट बंद करणार : तमिळनाडू सरकार
“केंद्र व मध्य प्रदेश सरकारने हे औषध मंजूर केलं होतं. परंतु, आम्ही त्यांना इशारा दिला होता. आता आम्ही त्या कंपनीविरोधात कायदेशीर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच आम्ही या कंपनीचं उत्पादन युनिट देखील कायमचं बंद करणार आहोत.”
तमिळनाडू सरकारची ड्रग कंट्रोलवर कारवाई
दुसऱ्या बाजूला तमिळनाडू सरकारने देखील त्यांच्या ड्रग कंट्रोलरला निलंबित केलं आहे. दीप जोसेफ व के कार्थिकेयन या दोघांनी औषध बनवणाऱ्या कारखान्याची नीट तपासणी न केल्याबद्दल त्यांना निलंबित केलं आहे.