नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर केलेली टीका काँग्रेसच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचे दिसते आहे. नरेंद्र मोदींनी भूज येथे स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या लाल किल्ल्यावरील भाषणाची खिल्ली  उडवली. त्यावर पलटवार करत काँग्रेसने मोदी घाणेरडे राजकारण खेळत असून, बड्या ‘बाता’ करण्यातच ते माहीर आहेत. मोदींनी पंतप्रधानांना दिलेले खुल्या चर्चेचे आव्हान केवळ ‘राजकीय दिवाळखोरी’ असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
“पंतप्रधानांआधी आमच्यासोबत चर्चेमध्ये मोदींनी टिकून दाखवावे”, असा चिमटा केंद्रीय परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी मोदींना काढला. मोदींना देशातली मोठी हस्ती होण्याची जरा जास्तच घाई झालेली आहे. स्वातंत्र्यदिनादिवशी राजकीय वैर विसरायचे असते, याचेदेखील भान उतावळया मोदींना राहिले नाही.”,  असा टोला खुर्शीद यांनी मारला.
पंतप्रधानांच्या भाषणासोबत स्वत:च्या भाषणाची तुलना करत मोदींनी ‘लहान तोंडी मोठा घास’ घेण्याचा प्रयत्न केल्याचे खुर्शीद म्हणाले.
नरेंद्र मोदींनी भूज येथील भाषणामध्ये सध्या देशामध्ये ‘सास, बहू और दामाद’ ही मालिका सुरू असल्याचे म्हणत, काँग्रेस अध्यक्षा सोनीया गांधी आणि त्यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांना कोपरखळी मारली होती. त्याला उत्तर देत काँग्रेसने मोदी यांनी घाणेरडे राजकारण थांबवावे, असा इशारा दिला.