अखिल भारतीय काँग्रेस समितीने आज (२ एप्रिल) लोकसभेसाठी १७ उमेदवारांची ११ वी यादी जाहीर केली. आज जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये आंध्र प्रदेश, बिहार, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. काँग्रेसने आंध्र प्रदेशमधील कडप्पा लोकसभा मतदारसंघातून वाय एस शर्मिला यांना उमेदवारी दिली आहे. लोकसभा निवडणुकीचे जागावाटपाचे काम अंतिम टप्प्यात आले असून काँग्रेसने आतापर्यंत २४० उमेदवारांची घोषणा केली आहे. याबरोबरच राहिलेल्या उमेदवारांच्या नावाची घोषणादेखील लवकरच होण्याची शक्यता आहे.

बहिण भावामध्ये होणार लढत

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी अविनाश रेड्डी यांना तिसऱ्यांदा कडप्पा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी आणि वाय एस शर्मिला यांचे अविनाश रेड्डी हे चुलत भाऊ आहेत. आता काँग्रेसकडून वाय एस शर्मिला यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे कडप्पा मतदारसंघात बहिण भावामध्ये लढत होणार आहे. कडप्पा मतदारसंघ हा रेड्डी कुटुंबाचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे येथे रेड्डी कुटुंब या निवडणुकीत आमने-सामने असणार आहे.

हेही वाचा : “अरविंद केजरीवाल तुरुंगात गेल्याने ‘आप’ला फायदा होणार”, फारुख अब्दुल्लांचं विधान चर्चेत; म्हणाले…

वाय एस शर्मिला यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या भगिनी वाय एस शर्मिला यांनी ४ जानेवारी रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीत वाय एस शर्मिला यांनी स्वत:च्या पक्षाचे उमेदवार उभे न करता काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर त्यांनी थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता काँग्रेसकडून वाय एस शर्मिला यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा

लोकसभेच्या उमेदवारांबरोबरच आज आंध्र प्रदेश विधानसभेच्या ११४ उमेदवारांची यादीही काँग्रेसकडून आज जाहीर करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपानेही आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली होती.