सरकारी नोकरी कुणाला प्रिय नसते? सरकारी नोकरी मिळावी, प्रशासकीय अधिकारी होता यावे, म्हणून लाखो विद्यार्थी वर्षानुवर्ष स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असतात. यापैकी अतिशय निवडक विद्यार्थ्यांना यश मिळतं. मात्र एवढ्या परिश्रमाने मिळालेली नोकरी मध्य प्रदेशमधील एका महिला उपजिल्हाधिकाऱ्याने काँग्रेसच्या शब्दाखातर सोडली. आता या माजी अधिकारी असलेल्या महिलेला आपल्या निर्णयाचा पश्चाताप होत असून आपली नोकरी परत मिळावी, यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

द इंडियन एक्सप्रेसशी बोलत असताना निशा बांगरे म्हणाल्या की, कांग्रेसने विधानसभेत तिकीट देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र मला उमेदवारी दिली नाही. तसेच आताही लोकसभेसाठी उमेदवारी नाकारण्यात आली. काँग्रेसने माझ्याशी दगाफटका केला. मला आता माझी नोकरी परत मिळवायची आहे.

मी माझी नोकरी सोडण्याचे धाडस केले. पण काँग्रेसने माझ्याबरोबर राजकारण केले. काँग्रेसने मला नोकरी सोडायला भाग पाडले. तर भाजपा सरकारने माझा राजीनामा स्वीकारण्यास उशीर केला. आता मी राज्यातील राजकारणाची बळी पडले आहे. माझ्या नशीबात जे काही आहे, ते मला स्वीकारावे लागणरा आहे. पण माझ्याबरोबर मोठा विश्वासघात आणि अन्याय झाला, अशी प्रतिक्रिया निशा बांगरे यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दिली.

सनदी अधिकारी ते राजकारणी असा प्रवास करण्याचा प्रवास करू इच्छिणाऱ्या बांगरे यांनी सांगितले की, ज्या कुणाला राजकारणात यायचे आहे. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आर्थिक, भावनिक स्तरावर भक्कम असली पाहिजे. मानसिक आघात सहन करण्यास तयार असाल तरच राजकारणात उतरा. राजकारण सर्वात कठीण आहे. एकवेळ स्पर्धा परीक्षेत यश मिळवता येईल, पण राजकारण हा अवघड मार्ग आहे, असेही त्या म्हणाल्या.

निशा बांगरे या छत्रपूर जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी म्हणून काम करत होत्या. लवकुशनगर प्रांताच्या उपविभागीय दंडाधिकारी म्हणून काम करत असताना त्यांनी नोकरीला राम राम ठोकला होता. कारण आंतरराष्ट्रीय सर्वधर्म शांती परिषद आणि बेतुल येथील जागतिक शांतता पुरस्कार समारंभाला उपस्थित राहण्यासाठी त्यांना सुट्टी नाकारण्यात आली होती. तेव्हा त्यांना बेतुल जिल्ह्यातील आमला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची संधी मिळेल, याची बिलकूल अपेक्षा नव्हती. पण आमला मतदारसंघात शासकीय पदभार स्वीकारल्यानंतर इथल्या लोकांनी मला राजकारणात येण्यास उद्युक्त केले, असे त्या म्हणाल्या.

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस पक्षाने माझ्याशी संपर्क साधला. प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी मला राजकारणात येण्यासाठी सुचविले. “काँग्रेसने माझ्याशी संपर्क साधला. माझी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. पण मी विचार केला की, जर मला संधी मिळत असेल तर ती स्वीकारायला हवी. शेवटी मला तिकीट मिळाले नाही. कमलनाथ मला तिकीट देऊ शकले असते. पण स्थानिक राजकारणामुळे मला त्यांनी संधी दिली नाही. बेतुलमधील काँग्रेस नेतृत्वाला एक सुशिक्षित महिला राजकारणात येतेय याची भीती वाटत होती. त्यामुळे मला संधी नाकारण्यात आली.

२७ मार्च रोजी प्रदेश काँग्रेसने निशा बांगरे यांना प्रवक्तेपद दिले. निशा बांगरे या लोकसभेच्या तिकीटासाठीदेखील इच्छुक होत्या, परंतु पक्षाने त्यांच्या नावाचा विचार केलेला नाही.