प्रत्युत्तरादाखल भाजपची टीका

नवी दिल्ली : केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा करामध्ये (जीएसटी) कपात करून बऱ्याच उशिरा मर्यादित सुधारणा केली आहे, अशी टीका काँग्रेसने सोमवारी केली. तसेच करकपातीमुळे ग्राहकांना लाभ होणार का, हा मोठा प्रश्न असल्याचे पक्षाने म्हटले आहे. दुसरीकडे, त्यावर, काँग्रेसच्या काळात यापेक्षा अधिक दराने कर आकारला जात होता, अशी टीका केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे.

‘जीएसटी’ची प्रक्रिया अजूनही गुंतागुंतीची आहे, त्यामध्ये सुधारणा करण्याची जास्त गरज असूनही ही प्रक्रिया सुलभ केलेली नाही, अशी टीका रमेश यांनी ‘पीटीआय’शी बोलताना केली. ते म्हणाले, “हा प्रकार एका बाजूला ‘मतचोरी’ आणि दुसऱ्या बाजूला जनतेला ‘जीएसटी’कपातीचा कोणताही फायदा होऊ न देणारी ‘नफेखोरी’ असा होऊ नये.” केंद्र सरकारने २०१७मध्ये ‘जीएसटी’ लागू केले तेव्हापासून राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने त्यासंबंधी समस्या दाखवून दिल्या होत्या. त्यावेळी लागू केलेला ‘गब्बर सिंग टॅक्स’च होता, अशी टिप्पणी रमेश यांनी केली. आम्ही तेव्हापासून त्यामध्ये सुधारणांची मागणी करत होतो, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री असताना विरोध

पंतप्रधान नरेंद्र मोदी आता ‘जीएसटी’साठी श्रेय घेत असले तरी, ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी २००६ ते २०१४ या काळात यूपीए सरकारच्या ‘जीएसटी’ प्रस्तावाला सातत्याने विरोध केला होता, अशी आठवण जयराम रमेश यांनी करून दिली.

जनतेमध्ये आनंदाची लाट – वैष्णव

सोमवारपासून लागू झालेल्या ‘जीएसटी’ दरकपातीमुळे जनतेमध्ये आनंदाची लाट आहे, असा दावा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला. त्याउलट काँग्रेस काळात सिमेंट, सॅनिटरी पॅड, रंग, पादत्राणे, टीव्ही आणि फ्रीज या वस्तूंवर १३ टक्क्यांपासून ३० टक्क्यांपर्यंत कर होते, याची आठवण वैष्णव करून दिली. काँग्रेसच्या काळात हे कर म्हणजे ‘गब्बर सिंगचे आजोबा’ होते अशी टीका वैष्णव यांनी केली.

मोदी सरकारने राहुल गांधी आणि काँग्रेसची टिंगलटवाळी केली, चिंतांकडे दुर्लक्ष केले आणि ‘जीएसटी’मध्ये कोणतेही बदल केले नाहीत. आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयातशुल्क लादल्यामुळे त्यांना कररचना सुधारावी लागली आहे. त्याचा ते सोहळा साजरा करत आहेत. – जयराम रमेश, सरचिटणीस, काँग्रेस