काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेली ‘भारत जोडो’ यात्रा सध्या हरियाणात पोहचली आहे. हरियाणातील कुरुक्षेत्र येथे राहुल गांधींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केलेल्या विविध विधानांवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. राहुल गांधीच्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर हरियणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
मनोहर लाल खट्टर यांनी म्हटले आहे की, “राहुल गांधींचे तत्वज्ञान नेमकं काय आहे, हे मला समजत नाही. कधी ते शिवभक्त बनतात, तर कधी पुजाऱ्यांवर निशाणा साधतात. राहुल गांधी जे बोलतात त्यामुळे भाजपाची नाहीतर उलट काँग्रेसचीच अडचण होते. ते खरंच पप्पू आहेत.”
याशिवाय, “कधी ते (राहुल गांधी) म्हणतात की राहुल गांधींना राहुल गांधींने मारून टाकलं आहे. कधी ते शिवभक्त बनतात. त्यांची कोणतीच दिशा समजत नाही. यामुळे केवळ आम्हीच नाही तर स्वत: काँग्रेसचे लोकही त्रस्त आहेत.” असंही खट्टर यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांच्या कौरव-पांडवबाबतच्या विधानाच्या पार्श्वभूमीवर म्हटलं आहे.
राहुल गांधी काय म्हणाले होते? –
यात्रेमुळे तुमच्या प्रतिमेत काय बदल झाला? असा प्रश्न प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारल्यावर राहुल गांधी म्हणाले, “आपण ज्या व्यक्तीला पाहत आहात, तो राहुल गांधी नाही. तुम्ही त्याला पाहू शकता, पण समजू शकत नाही. हिंदू धर्मग्रंथांना वाचा, शिवजीबद्दल वाचा तेव्हा तुम्हाला समजू शकेल. राहुल गांधी तुमच्या आणि भाजपाच्या डोक्यात आहे. पण, मी राहुल गांधीला मारुन टाकलं आहे. मला माझ्या प्रतिमेशी घेणं-देणं नाही. प्रतिमेबद्दल मला कोणताही रस नाही. तुम्ही मला चांगलं किंवा वाईट बोलू शकता.”
याशिवाय “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ( आरएसएस ) आणि मोदींना वाटतं सर्वांनी त्यांची पूजा करावी. पण, याला तपस्या हे उत्तर आहे. काँग्रेससह लाखो लोक तपस्या करत आहे. जो आमची पूजा करेल, त्याला सन्मान करण्यात येईल, असं आरएसएस सांगतं. पण, देशात तपस्या करणाऱ्यांचा सन्मान झाला पाहिजे. ही लढाई पूजा आणि तपस्येमध्ये आहे. काँग्रेसमध्ये तपस्येची उणीव होती, ती यात्रेमुळे पूर्ण झाली.” असंही राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं.
