काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मंदिरांच्या आकाराचा केक कापल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. केक कापतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपाकडून कमलनाथ यांच्यावर सडकून टीका करण्यात आली आहे. हा प्रकार हिंदूंचा अपमान असल्याचं भाजपानं म्हटलं आहे.
Shraddha Walkar Murder: “आफताबचे ते शब्द ऐकून मी खालीच कोसळलो…”, श्रद्धाच्या वडिलांनी मांडली व्यथा
व्हिडीओमध्ये कमलनाथ मंदिराच्या आकाराचा केक कापताना दिसत आहेत. या केकवर भगवा झेंडा आणि हनुमानाचा फोटोदेखील दिसून येत आहे. १८ नोव्हेंबरला कमलनाथ यांचा वाढदिवस आहे. छिंदवाडाच्या तीन दिवसीय भेटीवर असताना त्यांचा वाढदिवस निवासस्थानी समर्थकांकडून साजरा करण्यात आला. यावेळी मंदिराचा केक कापण्यात आल्याचे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे.
वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी टीका केली आहे. धार्मिक चिन्ह असलेला केक कापून कमलनाथ यांनी लोकांच्या भावना दुखावल्या आहेत, असं चौहान यांनी म्हटलं आहे. “कमलनाथ आणि त्यांचा पक्ष खोटे भक्त आहेत. त्यांचा देवाशी काहीही संबंध नाही. राम मंदिराला विरोध करणाऱ्या पक्षाचे ते प्रतिनिधित्व करतात. या भूमिकेचा निवडणुकीत फटका बसत असल्याचं जाणवताच ते हनुमान भक्त झाले आहेत”, असं टीकास्र चौहान यांनी डागलं आहे. हनुमानाचा फोटो असलेला केक त्यांनी कापला, हा हिंदू धर्मासह सनातन संस्कृतीचा अपमान आहे, असेही चौहान म्हणाले आहेत.