पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी प्रचार करत आहेत. तसंच लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. अशात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. मल्लिकार्जुन खरगेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. आज संध्याकाळी ६ वाजता सहाव्या टप्प्यातलं मतदान संपलं आहे. तर १ जूनच्या दिवशी लोकसभा निवडणुकीचा सातवा टप्पा पार पडणार आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे पाच टप्पे पार पडले. या सगळ्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात रेकॉर्डब्रेक सभा घेतल्या. देवेंद्र फडणवीस यांनी तर १०० हून अधिक सभा घेतल्या. आता १ जूनचा एक टप्पा राहिला आहे. ज्यानंतर ४ जूनला लोकसभेचा निकाल लागणार आहे. त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अशात मल्लिकार्जुन खरगेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी विषासारखे आहेत असं म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे.

काय म्हटलं आहे मल्लिकार्जुन खरगेंनी?

“पंतप्रधान नरेंद्र मोदी गंगेने बोलवून घेतलं आहे. २०४७ पर्यंत ते शासन करणार आहेत असंही त्यांचं म्हणणं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गंगेत डुबकी मारतात, गुहेत जाऊन बसतात, ध्यानधारणा करतात, तपश्चर्या करतात. या सगळ्याचं फळ त्यांना मिळणार असेल तर माहीत नाही. मला वाटतं की काम केलं की तुम्हाला दोनवेळची भाकरी मिळते.” असं वक्तव्य खरगेंनी केलं आहे.

हे पण वाचा- “काँग्रेस संपली, आता तुम्हाला कुठेही..”, मल्लिकार्जुन खरगे असं का म्हणाले? Video चा रोख भाजपावर पण घडलं उलटंच

चांगलं काम केलं की चांगला निकाल लागतो

मल्लिकार्जुन खरगे पुढे म्हणाले, “चांगलं काम केलं की चांगला निकाल लागतो, वाईट काम केलं की वाईट निकाल लागतो. जर वाईट करुन चांगला निकाल लागतो असं असेल तर काय बोलणार? आम्ही जर म्हटलं हे विष आहे त्याला हात लावू नकोस. तरीही एखादा माणूस म्हणाला मी विष चाटून पाहतो काय होईल? मोदींचं तसंच आहे.” असा टोला मल्लिकार्जुन खरगेंनी लगावला आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अखेरच्या टप्प्यात

लोकसभेची रणधुमाळी अखेरच्या टप्प्यात आहे. भाजपाने एनडीएसह ४०० पारचा नारा दिला आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीनेही आम्ही सत्तेवर येऊ असा दावा वारंवार केला आहे. यावेळी मोदींना जनता नाकारणार आहे असंही इंडिया आघाडीच्या नेत्यांनी म्हटलं आहे. तसंच राहुल गांधींनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. मात्र नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विषासारखे आहेत अशी शेलकी टीका मल्लिकार्जुन खरगेंनी केली आहे.