काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशात ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान भाजपावर हल्लाबोल केला आहे. “सर्व लोकशाही मार्ग बंद झाल्याने आम्ही ‘भारत जोडो’ यात्रा सुरू केली आहे. लोकसभा, निवडणुकीचा मार्ग, माध्यमं सर्व बंद आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपाने या सर्व संस्थांना वेठीस धरलं आहे. न्यायव्यवस्था, न्यायालयं दबावात आहे. त्यामुळे आम्हाला वाटलं की आता एकच पर्याय आहे. रस्त्यावर उतरुन लोकांच्या, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या. मजूर, छोटे व्यापारी यांच्यात सामील व्हावं”, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.
२०२० मध्ये काँग्रेसला मध्य प्रदेशात मोठा फटका बसला होता. काँग्रेसमधील तत्कालीन नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी २० निष्ठावंतांसोबत भाजपात प्रवेश केल्यानंतर काँग्रेस सरकार कोसळलं होतं. यावेळी घोडेबाजार झाल्याचा आरोप करत गांधी यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे. “आम्ही मध्य प्रदेशात निवडणूक जिंकलो होतो. तेथे आमचं सरकार होतं. मात्र, त्यांनी (भाजपा) २० ते २५ भ्रष्टाचारी आमदारांना कोट्यावधी रुपये देत खरेदी केले आणि सरकार स्थापन केलं”, असा आरोप बुऱ्हानपूर येथील सभेत राहुल गांधींनी केला आहे.
राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने कन्याकुमारी ते श्रीनगर अशी ३ हजार ५७० किलोमीटरची पदयात्रा काढली आहे. महाराष्ट्रातून ही यात्रा बुधवारी सकाळी मध्य प्रदेशातील बोदारली गावात दाखल झाली. या गावाचं नेहरु-गांधी कुटुंबाशी ऐतिहासिक नातं आहे. दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी अनेकदा या भागाला भेट दिली आहे. मध्य प्रदेशात आगामी वर्षात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यादृष्टीने राहुल गांधींची ही पदयात्रा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. पदयात्रेच्या वाटेतील पाच लोकसभा मतदारसंघ आणि २६ विधानसभा जागांवर प्रभाव निर्माण करण्याच्या प्रयत्नात काँग्रेस आहे. विधानसभेच्या दोन जागा वगळता सर्व जागांवर भाजपाचे वर्चस्व आहे.