राजस्थान काँग्रेसचे प्रभारी सुखजिंदर सिंग रंधावा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत एक विधान केलं आहे. मोदींना संपवलं तरच भारत वाचू शकेल, असं वक्तव्य सुखजिंदर सिंह रंधावा यांनी केलं आहे. तसेच, देशात काय होणार हे मोदी नाहीतर अडाणी ठरवत आहेत, असेही रंधाना यांनी म्हटलं. रंधावा यांच्या विधानानंतर भाजपाकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
एका कार्यक्रमात बोलताना सुखजिंदर सिंग रंधावा म्हणाले की, “काँग्रेस नेत्यांनी गटबाजी संपवली पाहिजे. देश वाचवण्यासाठी पंतप्रधान मोदींना राजकीय दृष्ट्या संपवलं पाहिजे. मोदी संपले तर, भारताची भरभराट होईल. अन्यथा देश उद्ध्वस्त होणार आहे. आपली लढाई अदाणींशी नसून भाजपाशी आहे. भाजपाला संपवलं, तर अदाणी आणि अंबानीही संपतील.”
“ब्रिटीशांनी भारतात आल्यावर ईस्ट इंडिया कंपनीला व्यवसायासाठी आणलं. तसं मोदींनी अदाणीला आणलं. ईस्ट इंडिया कंपनीने देशाला २०० वर्षे लुटलं आणि संपूर्ण देशावर ताबा मिळवला. आता अदाणी देशाला उद्ध्वस्त करतील आणि देशाची वाटचाल पुन्हा गुलामगिरीकडे होईल. देशात काय होणार हे मोदी नाहीतर अदाणी ठरवत आहेत,” असा घणाघात सुखजिंदर सिंग रंधावा यांनी केला.
हेही वाचा : बीबीसीच्या क्षमायाचनेनंतर गॅरी लिनेकर पुन्हा स्टुडिओत
सुखजिंदर सिंग रंधावा यांच्या वक्तव्यानंतर भाजपा नेत्याने काँग्रेसला सवाल विचारला आहे. “पुन्हा एकदा काँग्रेसने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. मोंदींना संपवण्यासाठी लोकांना भडकवत आहेत. काँग्रेस आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करणार की? बक्षीस देत त्यांच्या विधानाचं समर्थन करणार?,” असा सवाल शेहजाद पुनावाला यांनी उपस्थित केला आहे.