नवी दिल्ली : “अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये मध्यस्थी केली मग, शस्त्रसंधी केला गेला असे दावा २९ वेळा केला आहे. तरीही केंद्र सरकार मध्यस्थीची बाब का मान्य करत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रम्प यांच्या दाव्यावर काही कसे बोलत नाहीत, माझे भाषण संपेपर्यंत ट्रम्पने ३० वेळा दावा केलेला असेल,” अशा शब्दांत राज्यसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेच बोलताना मंगळवारी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदींना लक्ष्य केले.
“पाकिस्तानशी भारताने एकतर्फी शस्त्रसंधी का गेला, भारतावर कोणता दबाव आला होता, ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये जगातील एकही देश भारताच्या बाजू का उभा नव्हता,” अशी प्रश्नांची सरबत्ती करून खरगे यांनी, मोदींच्या पाकिस्तान दौऱ्यावर बोट ठेवले. खरगेंनी मोदी व उद्योजक गौतम अदानी यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी युद्ध थांबवण्यासाठी व्यापाराच्या माध्यमातून भारताला ब्लॅकमेल केले. या व्यापाराचा कोणाला फायदा झाला असता, आपल्या उपजीविकेसाठी आपला देश विकण्यास तयार असलेली व्यक्ती कोण आहे, या व्यक्तीला कोण पाठिंबा देत आहे, असा प्रश्न खरगेंनी केला.
पाकिस्तानसह जगाला स्पष्ट संदेश
राज्यसभेत केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देताना, दहशतवादाविरोधात भारत कुठल्याही टोकाची कारवाई करून शकतो, हा स्पष्ट संदेश पाकिस्तान आणि जगाला दिला गेला, असे सांगितले. पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट करण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले गेले. हे उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर ते थांबवण्यात आले पण, पाकिस्तानने पुन्हा कुरापत काढली तर त्याची पुन्हा अंमलबजावणी केली जाईल, असे लोकसभेप्रमाणेच राज्यसभेतही राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. पाकव्याप्त काश्मीरमधील लोक कधीतरी परत येती आणि तेही स्वतःला भारतीय मानतील असा मला विश्वास आहे, असे ते म्हणाले.
नड्डांची टिप्पणी आणि दिलगिरी
मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या टिप्पणीनंतर सभागृहाचे नेते जे पी नड्डा यांनी खरगे यांचे मानसिक संतुलन ढासळल्याची टीका केली. विरोधकांनी नड्डा यांच्या टिप्पणीवर तीव्र आक्षेप घेतला. त्यानंतर नड्डा यांनी आपले विधान मागे घेतले आणि माफी मागितली. त्याचवेळी खरगे यांचे मोदींसंबंधीचे विधान सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकावे अशी मागणीही त्यांनी केली.
पहलगाम हल्ल्याची आम्ही निंदा करतो. हा हल्ला अत्यंत घृणास्पद होता. आम्ही पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याची निंदा करतो पण, तिकडे मोदी न बोलवता पाकिस्तानला जातात आणि त्यांच्या पंतप्रधानाची गळाभेट घेतात. – मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते, राज्यसभा