Priyanka Gandhi Speech in Loksabha: पहलगाम हल्ला व त्यानंतर भारतीय लष्करानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या पावसाळी अधिवेशनात चर्चा चालू आहे. लोकसभेतील या चर्चेदरम्यान काँग्रेसच्या वायनाडमधील खासदार प्रियांका गांधींनी सत्ताधाऱ्यांवर तीव्र शब्दांत टीकास्र सोडलं. तसेच, युद्ध होता होता का थांबवलं? पाकिस्तानला शरण येऊच का दिलं? पहलगाम हल्ल्याबाबत आधी कसलीच माहिती गुप्तहेर खात्याला कशी नव्हती? या हल्ल्याची जबाबदारी पंतप्रधान, गृहमंत्री घेणार का? असे सवालही त्यांनी उपस्थित केले आहेत. आपल्या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष्य केलं आहे.

“मोदींना ऑपरेशन सिंदूरचं श्रेय हवंय”

आपल्या लष्करानं शौर्य गाजवलं असताना त्याचं श्रेय मोदींना हवंय, असं प्रियांका गांधी म्हणाल्या. “तुम्ही तर स्वत:च स्वत:च्या पाठीवर शाबासकी देऊन घेता. सैन्य, देश, संसदेपासून सत्य लपवता. ऑपरेशन सिंदूर सुरू झालं तेव्हा आम्ही सगळ्यांनी समर्थन दिलं. आपल्या फौजांनी यावेळी शौर्य गाजवलं. पण या ऑपरेशनचं श्रेय आपल्या पंतप्रधानांना हवंय. ठीक आहे. ऑलिम्पिकमध्ये मेडल आलं की त्याचंही श्रेय ते घेतात. पण फक्त श्रेय घेऊन नेतृत्व सिद्ध होत नाही. जबाबदारीही घ्यावी लागते. देशाच्या इतिहासात हे पहिल्यांदा असं घडलं की युद्ध होता होता थांबलं. आणि ते थांबल्याची घोषणा आपलं लष्कर, आपलं सरकार करत नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करतात. हे आपल्या पंतप्रधानांच्या बेजबाबदारपणाचं सर्वात मोठं निदर्शक आहे”, असं प्रियांका गांधी यावेळी म्हणाल्या.

पाकिस्तानला शरण येऊच का दिलं? – प्रियांका गांधी

अमित शाहांनी आपल्या भाषणात पाकिस्तानला शरण येण्याशिवाय पर्यायच नव्हता, असा उल्लेख केला. त्याचा संदर्भ प्रियांका गांधींनी आपल्या भाषणात केला. “गृहमंत्री म्हणाले की पाकिस्तानकडे शरण येण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. तुम्ही त्यांना शरण येऊच का दिलं? ते तुमच्या देशात येतात, लोकांना मारून टाकतात आणि तुम्ही त्यांना शरण येऊ देता? शाहांनी याचा उल्लेख केला आणि लगेच ते इतिहासातही गेले. नेहरूंनी काय केलं, इंदिरा गांधींनी काय केलं, अगदी माझ्या आईच्या अश्रूंपर्यंत पोहोचले. पण शत्रूकडे आपल्याला शरण येण्याशिवाय पर्यायच नव्हता तेव्हा हे युद्ध का थांबलं यावर त्यांनी काहीच सांगितलं नाही”, अशी विचारणा प्रियांका गांधींनी लोकसभेत केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान मोदींना टोला

दरम्यान, प्रियांका गांधींनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑपरेशन सिंदूरच्या यशाचं श्रेय घेत असल्याची टीका केली. “देशाचं नेतृत्व फक्त यशाचं श्रेय घेतल्याने मजबूत होत नाही. यश व अपयश या दोघांची जबाबदारी घेतल्याने सक्षम होते. हा सोन्याचा नाही तर काट्यांचा मुकुट आहे. जेव्हा सरकार खोटं आणि घबरट असतं, तेव्हा ते शूरातल्या शूर सैन्यालाही कमजोर करतं”, अशा शब्दांत त्यांनी मोदींना टोला लगावला.

“महान देशभक्त शहीद इंदिरा गांधी यांनी यशस्वी धोरणाच्या आधारावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निक्सन यांचा सामना करून पाकिस्तानची फाळणी केली, बांगलादेशची निर्मिती केली, एक लाख पाकिस्तानी सैन्याला आत्मसमर्पण करायला लावलं, त्यांनी कधीच याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला नाही”, असं उदाहरणही त्यांनी मोदींना उद्देशून दिलं.