Shashi Tharoor on Congress Family Politics: काँग्रेस खासदार शशी थरूर हे त्यांच्या अलंकारिक इंग्रजी भाषेसाठी ओळखले जातात. पण गेल्या काही दिवसांमध्ये शशी थरूर यांनी थेट आपल्याच पक्षाच्या चुकांवर थेट भाष्य केल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. शशी थरूर यांच्या या विधानांवर पक्षातील काही उच्चपदस्थांनी वेळोवेळी नाराजीदेखी व्यक्त केली आहे. मात्र, त्यानंतरही शशी थरूर यांनी पक्षावर जाहीर टीका करणं काही थांबवलेलं नाही. आता तर त्यांनी थेट नेहरू-गांधी कुटुंबालाच लक्ष्य केलं आहे. भारतात नेहरू-गांधी कुटुंबानं राजकीय नेतृत्व हा जन्मसिद्ध हक्क ठरवला असल्याचं विधान शशी थरूर यांनी केलं आहे.
इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, शशी थरूर यांनी ‘Project Syndicate’ साठी लिहिलेला एक लेख ३१ ऑक्टोबर रोजी प्रकाशित झाला. या लेखामध्ये शशी थरूर यांनी काँग्रेसमधील राजकीय घडामोडी आणि पक्षांतर्गत भूमिकांवर भाष्य केलं आहे. अनेक दशकांपर्यंत एकाच कुटुंबानं देशाच्या राजकारणाला प्रभावित केल्याचाही मुद्दा त्यांनी या लेखामध्ये मांडला आहे.
गांधी कुटुंबाबाबत काय म्हणाले शशी थरूर?
“गेल्या अनेक दशकांपासून एका कुटुंबानं भारतीय राजकारणावर प्रभाव टाकला आहे. हा प्रभाव नेहरू-गांधी कुटुंबाचा आहे. यामध्ये स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, पंतप्रधान इंदिरा गांधी व राजीव गांधी आणि विद्यमान लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी व खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांच्यापर्यंतच्या नेत्यांचा यात समावेश होतो. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातही या घराण्याचा प्रभाव दिसतो. पण त्याचवेळी या घराण्याने राजकीय नेतृत्व हा जन्मसिद्ध हक्क असल्याची पद्धत रुजवली. हीच पद्धत आता भारतीय राजकारणात प्रत्येक पक्ष, प्रत्येक प्रांत आणि प्रत्येक पातळीवर रुजली आहे”, असं शशी थरूर यांनी या लेखात म्हटलं आहे.
इंडियन एक्स्प्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिरूअनंतपुरमचे खासदार असलेल्या शशी थरूर यांनी राहुल गांधी व प्रियांका गांधी यांच्याबाबत केलेल्या विधानांमुळे पक्षांतर्गत नाराजी व्यक्त होत आहे. मात्र, पक्षाकडून या लेखावर अधिकृतरीत्या अद्याप कोणतीही भूमिका मांडण्यात आलेली नाही. काँग्रेसचे जनसंपर्क प्रमुख जयराम रमेश व प्रसिद्धी प्रमुख पवन खेरा यांनी यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला, खुद्द थरूर यांनादेखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून उत्तर आलं नसल्याचं इंडियन एक्स्प्रेसनं म्हटलं आहे.
दरम्यान, असं असलं तरी पक्षात यासंदर्भात नाराजी असल्याची बाब एका वरीष्ठ काँग्रेस नेत्यानं सांगितली आहे. “शशी थरूर लक्ष स्वत:कडे वेधून घेण्यासाठी अशा गोष्टी वारंवार करतात, पक्षानं त्यांच्या अशा विधानांची दखल का घ्यावी?” असा प्रश्नही या नेत्यानं केला आहे.
शिवसेनेसह प्रादेशिक पक्षांवरही शशी थरूर यांचं भाष्य
दरम्यान, शशी थरूर यांनी शिवसेना, समाजवादी पक्ष, पीडीपी व नॅशनल कॉन्फरन्ससारख्या प्रादेशिक पक्षांमध्येदेखील घराणेशाहीची व्यवस्था रूजल्याचं शशी थरूर यांनी या लेखात नमूद केलं आहे.
“राजकीय घराणेशाहीमुळे भारतीय लोकशाहीसमोर एक मोठं आव्हान निर्माण झालं आहे. जेव्हा राजकीय सत्ता ही पात्रता, बांधिलकी, तळागाळात उतरून काम या गोष्टींपेक्षा वारसा हक्काने निश्चित होते, तेव्हा शासनाचा दर्जा खालावतो. कमी पर्यायांमधून निवड करणं तुलनेनं सोपं असतं. पण हे तेव्हा त्रासदायक ठरतं, जेव्हा उमेदवाराचा मुख्य पात्रता निकष हे त्याचं आडनाव असतं”, असं शशी थरूर यांनी त्यांच्या लेखात म्हटलं आहे.
“जोपर्यंत भारतीय राजकारण एखादी कौटुंबिक संस्था म्हणून काम करेल, तोपर्यंत लोकशाहीचं खरं आश्वासन, लोकांचं लोकांसाठी लोकांनी चालवलेलं राज्य, अस्तित्वात येणार नाही”, अशी परखड टिप्पणीदेखील त्यांनी केली आहे.
