scorecardresearch

मोदींविरोधात खरगेंच्या विधानामुळे भाजपकडून गुजराती अस्मितेचा मुद्दा; गुजरातमध्ये मतदानाच्या तोंडावर वाद शिगेला

‘गुजराती अस्मिते’ला विरोध करणाऱ्या काँग्रेसला मत न देण्याचे आवाहन भाजपचे नेते करत आहेत.

मोदींविरोधात खरगेंच्या विधानामुळे भाजपकडून गुजराती अस्मितेचा मुद्दा; गुजरातमध्ये मतदानाच्या तोंडावर वाद शिगेला
(संग्रहित छायाचित्र) photo source : loksatta file photo

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातील आरोप-प्रत्यारोप तीव्र

नवी दिल्ली : काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘रावण’ असा उल्लेख केल्यामुळे गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातील काँग्रेस आणि भाजप यांच्यातील राजकीय चिखलफेकीने उग्र रूप घेतले आहे. खरगे यांच्या मोदींवरील उपहासात्मक टिप्पणीमुळे भाजपच्या हाती कोलीत मिळाले असून ‘गुजराती अस्मिते’ला विरोध करणाऱ्या काँग्रेसला मत न देण्याचे आवाहन भाजपचे नेते करत आहेत.

अहमदाबादमधील बेहरामपुरा भागात सोमवारी प्रचारसभेत, खरगे यांनी मोदींना उद्देशून ‘तुम्ही १०० तोंडांचे रावण आहात का?’ असा खोचक प्रश्न विचारला होता. मोदी सगळीकडे दिसतात, महापालिकेच्या निवडणुकीत, विधानसभेच्या निवडणुकीत, लोकसभा निवडणुकीत, सगळय़ाच निवडणुकीत मोदींचा चेहरा पुढे केला जातो. महालिकेच्या निवडणुकीत उमेदवारांच्या नावे मत मागा, पालिकेत गरज लागली तर मोदी काम करायला येणार आहेत का?, असा सवाल खरगे यांनी केला. 

मौत के सौदागरची आठवण

खरगेंचे विधान गुजराती अस्मितेविरोधात असल्याचा आरोप भाजपने केला. काँग्रेसच्या तत्कालीन पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदींना ‘मौत के सौदागर’ म्हटल्याची आठवण भाजपच्या समाजमाध्यम विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी गुजराती मतदारांना करून दिली. गुजरातमध्ये काँग्रेस पराभूत होत असल्याचे दिसू लागल्याने हडबडून गेलेल्या खरगेंना स्वत:च्या शब्दांवरही नियंत्रण ठेवता आले नाही. अजूनही काँग्रेस गुजराती भूमिपुत्राचा अवमान करत आहे, अशी टीका मालवीय यांनी केली. २००७ मधील गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सोनिया गांधींनी मोदींचा ‘मौत के सौदागर’ असा वादग्रस्त उल्लेख केला होता. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत केलेल्या या विधानाचा जबर राजकीय फटका काँग्रेसला भोगावा लागला होता.

काँग्रेसला धडा शिकवा! 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुसूदन मिस्त्री यांनी काही दिवसांपूर्वी प्रचारसभेत, ‘मोदींना लायकी दाखवून देऊ’, असे आक्षेपार्ह विधान केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातची शान आहेत, नागरिकांच्या विकासासाठी कष्ट करत आहेत. पण, काँग्रेसचे नेते मात्र मोदींना लाखोली वाहात आहेत. गुजरातच्या मतदारांनी भाजपला मतदान करून काँग्रेसला चांगला धडा शिकवावा, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्रा यांनी केले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 04:35 IST

संबंधित बातम्या