scorecardresearch

Congress Presidential Election: मल्लिकार्जुन खरगे अध्यक्ष झाले तरी, यांच्यासारखे नेते…, शशी थरुर यांचं मोठं विधान

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शशी थरुर आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यात थेट लढत

Congress Presidential Election: मल्लिकार्जुन खरगे अध्यक्ष झाले तरी, यांच्यासारखे नेते…, शशी थरुर यांचं मोठं विधान
शशी थरुर आणि मल्लिकार्जून खरगे

काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. अध्यक्षपदाच्या या निवडणुकीत शशी थरुर आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यात थेट लढत होणार आहे. मल्लिकार्जुन खरगे यांना मिळणारा पाठिंबा पाहता तेच नवे अध्यक्ष होणार हे जवळपास निश्चित आहे. यादरम्यान, शशी थरुर यांनी एक मोठं विधान केलं असून खरगे पक्षात कोणताही बदल घडवणार नाहीत असं म्हटलं आहे. खरगे आहे तीच व्यवस्था पुढे कायम ठेवतील असंही त्यांनी सांगितलं.

शशी थरुर यांनी आपण जर पक्षाचे अध्यक्ष झालो, तर कार्यकर्त्यांच्या अपेक्षेनुसार बदल घडवू असा दावा केला आहे. ते म्हणाले “आम्ही शत्रू नाही आणि हे काही युद्ध नाही. पक्षाच्या भविष्यासाठी ही निवडणूक आहे. खरगे पक्षाच्या पहिल्या तीन नेत्यांमधील आहेत. त्यांच्यासारखे नेते पक्षात कोणताही बदल आणू शकणार नाहीत. सध्या आहे तीच व्यवस्था पुढे कायम ठेवली जाईल. कार्यकर्त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मी बदल घडवू शकतो”.

सत्ताधाऱ्यांनी महात्मा गांधींचा वारसा सांगणे सोपे; पण अनुकरण कठीण – राहुल गांधी

दरम्यान, याआधी मल्लिकार्जुन खरगे यांनी आपण कोणालाही विरोध करण्यासाठी नाही, तर पक्ष मजबूत करण्यासाठी निवडणूक लढत असल्याचं स्पष्ट केलं. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी विनंती केल्यानेच आपण निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.

झारखंडचे माजी मुख्यमंत्री के एन त्रिपाठी यांचा उमेदवारी अर्ज नाकारण्यात आल्याने शशी थरुर आणि खरगे यांच्यातच ही लढत होणार आहे. दुसरीकडे राज्यात राजकीय तणाव निर्माण झाल्याने निवडणुकीतून माघार घेतलेले राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी खरगेंना पाठिंबा दर्शवला आहे.

आता काँग्रेस बंडखोरमुक्त! ; ‘जी-२३’ गटातील नेतेही पाठीशी असल्याचा खरगेंचा दावा

अशोक गेहलोत म्हणाले “शशी थरुर हे उच्चभ्रू वर्गातील आहेत. बूथ, जिल्हा स्तरावर पक्ष मजबूत करण्यासाठी ज्या अनुभवाची गरज आहे तो शशी थरुर यांच्याकडे नव्हे तर खरगेंकडे आहे. त्यामुळे ही एकतर्फी निवडणूक होणार असल्याचं स्पष्ट आहे”.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ८ ऑक्टोबर आहे. उमेदवारांची अंतिम यादी ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. बिनविरोध निवडणूक न झाल्यास १७ ऑक्टोबरला मतदान होणार असून १९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. त्याच दिवशी निकाल जाहीर होतील. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ९ हजारांहून अधिक प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी मतदान करतील.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या