आगामी काही महिन्यांत आंध्र प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. आंध्र प्रदेशच्या नागरिकांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. आम्ही सत्तेत आलो तर पात्र गरीब कुटुंबाना दर महिन्याला ५ हजार रुपये मदत म्हणून दिले जातील, असं खरगे म्हणाले. ते सोमवारी अनंतपूर येथे एका सभेत बोलत होते. खरगे म्हणाले, ही केवळ घोषणा किंवा आश्वासन नाही तर गॅरंटी आहे.

यावेळी बोलताना खरगे यांनी भाजपावर टीका केली आणि मतदारांना काँग्रेसला मतदान करण्याचं आवाहन केलं. तसेच खरगेंनी ५ हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली. या योजनेला ‘इंदिराम्मा युनिव्हर्सल बेसिक इन्कम’ असं नाव देण्यात आलं आहे. या योजनेअंतर्गत पात्र गरीब कुटुंबातील महिलेच्या बँक खात्यावर हे ५ हजार रुपये वर्ग केले जातील.

खरगे यांनी अनंतपूरमधील जनसभेला संबोधित करताना मतदारांना आश्वासन दिलं की, आमचा पक्ष सत्तेत आला तर आम्ही कडापामधील दुगाराजपट्टनम बंदराचा विकास करू तसेच एक पोलाद कारखाना सुरू करू. राज्याचा विकास सुनिश्चित करण्यासाठी आम्ही रायलसीमा आणि उत्तर आंध्र प्रदेश भागासाठी विशेष अनुदान देऊ.

दरम्यान, खरगे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करून काँग्रेसच्या आश्वासनांची माहिती दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी म्हटलं आहे की, आमची गॅरंटी (हमी) ही मोदींच्या गॅरंटीसारखी नाही. काँग्रेस पक्ष जी काही आश्वासनं देतो ती आश्वासनं पूर्ण केली जातातच.

हे ही वाचा >> फडणवीसांचा विधानसभेतून हल्लाबोल अन् मनोज जरांगेंनी मागितली माफी; म्हणाले “उपोषणावेळी अनावधानाने…”

मल्लिकार्जुन खरगे अनंतपूरमधील सभेत बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत म्हणाले, त्यांनी देशात दोन कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु, त्यांनी त्यांचं आश्वासन पूर्ण केलं नाही. सर्व भारतीयांच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करू असंही ते म्हणाले होते, ते आश्वासनही त्यांनी पूर्ण केलं नाही. शेतकऱ्यांचं उत्पादन दुप्पट करण्याची घोषणा केली होती त्याचं काय झालं? तसेच शेतकरी आज सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहेत.