सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे प्रमुख ओपी राजभर यांनी मोहम्मद अली जिना यांना भारताचे पहिले पंतप्रधान केले असते तर फाळणी झालीच नसती, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या विधानाच्या एका दिवसानंतर एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी गुरुवारी काँग्रेस आणि त्यावेळचे नेतेच फाळणीला जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

एका जाहीर सभेला संबोधित करताना ओवेसी म्हणाले, “मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पार्टी आणि समाजवादी पार्टी यांचे जे लोक इतिहास वाचत नाही, त्यांना आव्हान देतो. फाळणी मुस्लिमांमुळे किंवा जिना यांच्यामुळे झाली नाही. त्यावेळी फक्त तेच मुस्लिम मतदान करू शकत होते जे नवाब किंवा पदवीधारकांसारखे प्रभावशाली होते. काँग्रेस आणि त्यावेळचे नेतेच फाळणीसाठी जबाबदार होते.”

सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे प्रमुख ओपी राजभर यांनी बुधवारी वाराणसीमध्ये मोहम्मद अली जिना यांना भारताचे पहिले पंतप्रधान केले असते तर देशाची फाळणी झाली नसती, असे वक्तव्य केल्यानंतर ओवेसी यांनी हे वक्तव्य केले आहे. राजभर यांनी या घटनेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जबाबदार धरले होते.

दरम्यान, कासगंज घटनेत तरुणाच्या मृत्यूबद्दल उत्तर पोलिसांवर टीका करताना एआयएमआयएम प्रमुख म्हणाले, “कासगंजची घटना तुमच्यासमोर आहे. अल्ताफच्या वडिलांना सांगण्यात आले की त्यांच्या मुलाने हुडीच्या तारने अडीच फूट उंच पाण्याच्या नळाला गळफास लावून आत्महत्या केली. परंतु कासगंज पोलिसांनीच त्या युवकाला ठार मारले आहे. युपी पोलिसांना तपास करणे माहित नाही तर खून करणे माहित आहे.”