हा गांधीजींचा अपमान – भाजप

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने रविवारी देशभरात संकल्प सत्याग्रह आंदोलन केले. ठिकठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांनी निदर्शनांमध्ये सहभाग घेतला. येथील राजघाटाजवळ झालेल्या आंदोलनात काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर जोरदार टीका केली. तर काँग्रेसचे आंदोलन हा महात्मा गांधींचा अपमान असल्याचा आरोप भाजपने केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महात्मा गांधींचे समाधीस्थळ असलेल्या ‘राजघाट’ येथे सत्याग्रह करण्यास दिल्ली पोलिसांनी काँग्रेसला परवानगी नाकारल्यामुळे बाहेरील मोकळय़ा जागी काँग्रेसने सत्याग्रह आंदोलन केले. देशाच्या ऐक्यासाठी हजारो किलोमीटर चाललेला, शहीद पंतप्रधानांचा मुलगा देशाचा, देशातील एका समूहाचा अपमान कसा करेल असा प्रश्न यावेळी वढेरा यांनी केंद्र सरकारला उद्देशून केला.‘‘देशाचे पंतप्रधान भित्रे आहेत’’ अशा तिखट शब्दांमध्ये त्यांनी हल्लाबोल चढवला. नीरव मोदी, ललित मोदी या फरार गुन्हेगारांवर टीका केली तर भाजपला इतक्या वेदना का झाल्या, असा सवाल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. राहुल गांधींच्या पाठीशी उभे राहिलेल्या विरोधी पक्षांचेही त्यांनी आभार मानले.

भाजपचे नेते वारंवार संसदेत आणि संसदेबाहेर आमच्या कुटुंबाचा अपमान करतात, पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई का केली जात नाही, राहुल यांनी संसदेमध्ये अदानींविषयी प्रश्न विचारले यात काय चुकले,  असे प्रियंका गांधी-वढेरा म्हणाल्या. देशाची अर्थव्यवस्था प्रगती करत असतानाही बेरोजगारी आहे, स्वयंपाकाच्या गॅसचे दर कमी होत नाहीत, छोटय़ा व्यापाऱ्यांना मदत करू शकत नाही असे त्या म्हणाल्या. भाजपच्या घराणेशाहीच्या टीकेला उत्तर देताना प्रियंका गांधी यांनी हिंदू परंपरांचे दाखले दिले. राम, पांडव यांनी स्वत:च्या कुटुंबांच्या संस्कारांचे पालन करण्यासाठी वनवास भोगला, त्याला तुम्ही घराणेशाही म्हणाल का, असा प्रश्न त्यांनी केला.

दिल्लीसह महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, जम्मू आणि काश्मीर, पंजाब, हरियाणा, कर्नाटक, तमिळनाडू, गुजरात या सर्व राज्यांमध्ये काँग्रेसने आंदोलन केले. गुजरात पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

काँग्रेस अधिक मजबूत होईल – चिदम्बरम

राहुल गांधी यांच्या अपात्रतेच्या मुद्दय़ामुळे काँग्रेस पक्ष अधिक मजबूत होईल असे मत पक्षाचे वरिष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी व्यक्त केले. देशात सध्या अघोषित आणीबाणी आहे आणि काँग्रेस हे भाजपचे मुख्य लक्ष्य आहे असे ते म्हणाले. काँग्रेस संपली तर देशातील प्रादेशिक पक्षांना सहज हाताळता येईल असे भाजपला वाटते, मात्र काँग्रेस कधीही संपणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 ‘राहुलना पाठिंबा नाही, भाजपला विरोध

राहुल गांधी यांना खासदार म्हणून अपात्र ठरवण्यास केलेला विरोध म्हणजे राहुल यांना पाठिंबा दिला असा नाही असे केरळमधील सत्ताधारी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने म्हटले आहे. माकप भाजपच्या लोकशाहीविरोधी कृत्यांच्या विरोधात आहे असा दावा पक्षाचे केरळमधील नेते एम व्ही गोविंदन यांनी केला. राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस आणि माकप एकत्र असले तरी केरळमध्ये मात्र ते एकमेकांचे प्रतिस्पर्धी पक्ष आहेत.

प्रादेशिक पक्षांना पाठिंबा द्यावा

भाजपविरोधातील लढाईमध्ये राष्ट्रीय पक्षांनी प्रादेशिक पक्षांना पाठिंबा द्यावा असे आवाहन समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केले. तसेच राहुल गांधी यांच्या अपात्रतेच्या मुद्दय़ावरून सत्याग्रह केल्याबद्दल त्यांनी काँग्रेसचे अभिनंदन केले. समाजवादी पक्षाला राहुल गांधी यांच्याबद्दल सहानुभूती वाटते का मुद्दा नाही तर देशाची लोकशाही टिकेल की नाही हा मुद्दा आहे असे ते म्हणाले.

मी म्हणते, या देशाचे पंतप्रधान भित्रे आहेत. चालवा माझ्यावरही खटला, मलाही तुरुंगात टाका. पण सत्य हे आहे की या देशाचे पंतप्रधान भित्रे आहेत. ते सत्तेच्या मागे लपले आहेत, अहंकारी आहेत. या देशाची, हिंदू धर्माची जुनी परंपरा आहे की अहंकारी राजाला जनता उत्तर देते. – प्रियंका गांधी-वढेरा, सरचिटणीस, काँग्रेस

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress satyagraha protests across india slams bjp over rahul gandhis disqualification zws
First published on: 27-03-2023 at 01:10 IST