काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि त्यांच्या पक्षातील सहकारी अंबिका सोनी यांनी दिल्लीमधील तिहार जेलमध्ये जाऊन पक्षाचे कर्नाटकमधील नेते डी के शिवकुमार यांची भेट घेतली. मनी लॉण्ड्रिंगच्या आरोपाखाली डी के शिवकुमार सध्या जेलमध्ये आहेत. यावेळी डी के शिवकुमार यांचे बंधू डी के सुरेशदेखील उपस्थित होते. सप्टेंबर महिन्यात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी डी के शिवकुमार यांना अटक केली होती. तपास यंत्रणांचा आरोप आहे की, ५७ वर्षीय काँग्रेस नेते शिवकुमार यांनी कर चुकवला असून करोडोंचे व्यवहार केले आहेत. दरम्यान दिल्ली न्यायालयाने डी के शिवकुमार यांना जामीन मंजूर केला आहे.
डी के सुरेश यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, “सोनिया गांधी यांनी शिवकुमार यांना पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून वेळ लागेल तेव्हाही पाठीशी असेल अशी हमी दिली. हा सगळा राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचंही त्यांनी म्हटलं. तसंच अनेक काँग्रेस नेत्यांना केंद्रातील भाजपा सरकारकडून टार्गेट केलं जात असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं”.
“आपल्याला भाजपाशी लढा द्यायचा असून यामधून बाहेर पडायचं आहे,” असंही सोनिया गांधी यांनी सांगितलं असल्याची माहिती डी के सुरेश यांनी दिली आहे.
शिवकुमार यांना अटक करण्यात आल्यानंतर काही दिवसांनी त्यांची २३ वर्षीय मुलगी ऐश्वर्या यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. २०१३ मध्ये एक कोटी असणारं वार्षित उत्पन्न २०१८ मध्ये १०० कोटी कसं काय झालं यासंबंधी आम्हाला माहिती जाणून घ्यायची असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. तसंच त्यांच्यात आणि वडिलांमध्ये कोणते व्यवहार करण्यात आले यासंबंधी माहिती मिळण्याचाही तपास यंत्रणा प्रयत्न करत आहे.
आयकर विभागाचे अधिकारी शिवकुमार यांच्याकडे पोहोचले असता ऑगस्ट २०१७ मध्ये त्यांच्याशी संबंधित अनेक जागांवर छापा टाकण्यात आला होता. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी राजकीय द्वेषातून शिवकुमार यांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप केला आहे.