महाराष्ट्रातील सत्तापेच सुटण्याची शक्यता निर्माण झाली असून शिवसेनेसोबत आघाडी करण्यास काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी संमती दिली असल्याची सुत्रांची माहिती आहे. नवी दिल्लीत राष्ट्रवादीसोबत एकत्रित बैठकीआधी काँग्रेस नेत्यांची पक्ष मुख्यालयात बैठक झाली. या बैठकीत सोनिया गांधी यांनी शिवसेनेसोबत आघाडी करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला असल्याची सुत्रांची माहिती आहे. या बैठकीसाठी मल्लिकार्जुन खरगे, ए. के. अँटोनी, के. सी. वेणुगोपाल, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपासोबत युती तुटल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेऊन सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. मात्र काँग्रेसमधून काही नेत्यांचा तसंच खुद्द सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचा शिवसेनेसोबत सत्तास्थापन करण्यास विरोध असल्याने चर्चा लांबणीवर पडत होती. राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील जोपर्यंत काँग्रेसकडून होकार येत नाही तोपर्यंत शिवसेनेला पाठिंबा दर्शवणार नाही सांगितलं होतं. यामुळे काँग्रेस काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. यानंतर बोलताना त्यांनी सोनिया गांधींसोबत राज्यातील सत्तास्थापनेबाबत कोणतीही चर्चा झाली नसून, शिवसेनेसोबतही अशी कोणती चर्चा सुरु नसल्याचं सांगितल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. आपल्या वक्तव्यांनी शरद पवारांनी सर्वांनाच बुचकळ्यात टाकलं होतं.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत किमान समान कार्यक्रमाच्या मसुद्यावर चर्चा झाली. पण, अशी काही चर्चाच झाली नसल्याचे शरद पवार यांनी सोमवारी सोनियांच्या भेटीनंतर सांगितल्याने विविध तर्कवितर्क लढविण्यात येत होते.

तसंच भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रसंगी शिवसेना सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची काँग्रेसची प्राथमिक तयारी होती. मात्र, काँग्रेसने सत्तेत सहभागी व्हावे, अशी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची स्पष्ट भूमिका होती. त्याप्रमाणे काँग्रेस सत्तेत सहभागी होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे राज्यातील नेतेही शिवसेनेला पाठिंबा देण्यास अनुकूल होते.

“शिवसेनेसोबत सरकार स्थापनेची चर्चा दोन ते तीन दिवसांत संपेल”
शिवसेनेसोबत सरकार स्थापनेची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांनी आज दिली. शरद पवारांनी सांगितलं की, शिवसेनेसोबत सरकार स्थापनेची चर्चा अंतिम टप्प्यात असून दोन ते तीन दिवसांत संपेल. आज सामायिक कार्यक्रम निश्चित होईल”.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress sonia gandhi shivsena uddhav thackeray ncp maharashtra political crisis sgy
First published on: 20-11-2019 at 17:04 IST