भारताच्या दक्षिणेत राहणारी लोक आफ्रिकन लोकांसारखे तर ईशान्य भारतातील लोक चीनी लोकांप्रमाणे दिसतात, असं विधान काँग्रसेचे नेते सॅम पित्रोदा यांनी केलं होते. त्यांच्या या विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. दरम्यान या वादानंतर आता सॅम पित्रोदा यांनी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली.

यासंदर्भात केलेल्या पोस्टमध्ये जयराम रमेश म्हणाले, सॅम पित्रोदा यांनी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच काँग्रेस अध्यक्ष अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनीही त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

सॅम पित्रोदा यांनी द स्टेट्समनला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारताच्या लोकशाहीबाबत बोलताना, भारताच्या दक्षिणेत राहणारी लोक आफ्रिकन लोकांसारखे तर ईशान्य भारतातील लोक चीनी लोकांप्रमाणे दिसतात, असं विधान केलं होते. भारतात एका बाजूला ईशान्येकडील लोक चीनी दिसतात, पश्चिमेकडची लोक अरबांसारखी दिसतात, तर उत्तर भारतातील लोक कदाचित गोऱ्या पाश्चात्य लोकांसारखी आणि दक्षिणेतील लोक आफ्रिकन नागरिकांसारखे दिसतात. तरीही त्याचा आपल्या जगण्यावर काहीही परिणाम झालेले नाही. आपण सर्वच बंधू आणि भगिनींप्रमाणे एकत्र नांदत वैविध्यपूर्ण देश एकत्र ठेवू शकलो. असे ते म्हणाले होते.

पित्रोदा यांच्या या विधानावरून चांगलाच वाद निर्माण झाला. पंतप्रधान मोदी यांच्यासह इतर भाजपा नेत्यांनी या विधानावरून काँग्रेसला लक्ष्य केलं होतं. “विरोधकांकडून जेव्हा मला शिवीगाळ केली जाते, तेव्हा ती मी सहन करू शकतो. परंतू माझ्या देशातील जनतेला कोणी काही म्हटलं, तर ते मला सहन होत नाही. आज त्वचेच्या रंगावरून आपण एखाद्या व्यक्तीची गुणवत्ता ठरवू शकत नाही”, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी दिली होती. तसेच “आपल्या त्वचेचा रंग कोणताही असो, आपण भगवान श्रीकृष्णाची पूजा करणारे लोक आहोत. मला पित्रादा यांच्या विधानाचा खूप राग आला आहे. आज जे लोक संविधानाचं रक्षण करण्याच्या गोष्टी करतात, तेच लोक आज त्वचेच्या रंगावरून भारतीय जनतेचा अपमान करत आहेत”, अशी टीकाही त्यांनी केली होती.

हेही वाचा – “अदाणी-अंबानींशी राहुल गांधींची गूप्त डील”, पंतप्रधान मोदींची टीका; म्हणाले, “किती बॅगा भरून…”

याशिवाय आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनीदेखील पित्रोदा यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. “सॅम भाई, मी ईशान्य भारतातला नागरिक आहे. परंतु, मी भारतीय लोकांसारखाच दिसतो. आपला देश विविधतेने नटलेला आहे. कदाचित आपण भिन्न दिसत असू मात्र आपण सर्वजण एकच आहोत,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तर अभिनेत्री आणि भाजपाची लोकसभेची उमेदवार कंगना रणौत म्हणाली, त्यांचं वक्तव्य वर्णद्वेषी आणि विभाजनवादी आहे. हे महाशय राहुल गांधी यांचे मार्गदर्शक आहेत.

महत्त्वाचे म्हणजे या विधानानंतर काँग्रेस पक्षाने पित्रोदा यांच्या विधानापासून दू राहण्याचा प्रयत्न केला. पित्रोदांच्या वक्तव्याशी काँग्रेसचा काडीमात्र संबंध नाही. तसेच ते काही आमचे प्रवक्तेदेखील नाहीत, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली होती.